Video – कोरोनाला हरवण्यासाठी अनिल कपूर मैदानात, नियम पाळण्याचे केले आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला हरवण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रम हा महत्त्वाकांक्षी सुरू केला आहे. या मोहिमेत पालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक मुंबईत घरोघरी जाऊन तपासणी-सर्वेक्षण करीत आहेत. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी मुंबईकरांनी पालिकेला साथ द्यावी, राज्य सरकारने घालून दिलेले नियम पाळावेत, आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांनी केले आहे.

वाढणारी कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात 15 सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला संपूर्ण महाराष्ट्राची साथ आहे. मुंबईतही प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून या मोहिमेत पालिकेला सहकार्य केले पाहिजे. कोरोना टाळण्यासाठी सरकारने घालून दिलेले नियम पाळले पाहिजेत असे आवाहन अनिल कपूर यांनी केले आहे. या उपक्रमात पालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत. कोरोनाबाबत मुंबईकरांमध्ये जनजागृती करीत आहेत. त्यामुळे कोरोनाला हरवण्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये सहभागी होऊन आपले योगदान द्या, असेही अनिल कपूर यांनी म्हटले आहे. या आवाहनाबाबतचा व्हिडीओ पालिकेने ट्विट केला आहे.