अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईतील सर्व कार्यालये बुधवारी बंद ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले आहे. मंगळवारी दुपारी सुरू झालेला पाऊस अद्याप सुरू असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. विजांचा कडकडाट व मेघगर्जनांनी मुंबईकरांची पुरती दाणादाण उडवली आहे. यात भर पडलीय ती लोकलसेवा बंद पडण्याची.

ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यानची लोकलसेवा  बंद पडल्यानंतर आता अंधेरी आणि चर्चगेट दरम्यानची लोकलसेवाही बंद पडली आहे. सध्या सर्वसामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीये. केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारीच लोकल ट्रेनने प्रवास करू शकत आहे. या प्रवाशांची संख्या कमी असली तरी रुळांवर पाणी साचल्याने आणि लोकल ट्रेनची वाहतूक बंद पडल्याने काही प्रवासी सायन स्टेशनमध्ये अडकून पडल्याचे वृत्त हाती आले आहे.

सायन-कुर्ला, चुनाभट्टी-कुर्ला या स्थानकांमध्ये आणि मश्जिद स्थानकाजवळ रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेने त्यांची सेवा काही काळ थांबवत असल्याचे जाहीर केले आहे. ठाणे-कल्याण आणि त्यापुढची लोकल वाहतूक सुरळित सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी एका ट्विटद्वारे सांगितले आहे. वाशी आणि पनवेलदरम्यानची लोकल वाहतूकही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लांब पल्ल्याच्या काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येत आहे.

अंधेरी आणि चर्चगेट स्थानकादरम्यानची पश्चिम रेल्वेची वाहतूकही बंद करण्यात आली होती. अप आणि डाऊन दिशेची वाहतूक 7.50 वाजता पुन्हा सुरू करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेने ट्विटरद्वारे कळवले आहे.

मंगळवारी दुपारपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड परिसरात पावसाला सुरुवात झाली होती. रिपरिप पडणाऱ्या पावसाने संध्याकाळ होईपर्यंत जोर धरला होता. रात्री विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. गेले तीन दिवस मुंबईकरांना सुर्याचे दर्शन झालेले नाही. बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दिवस मावळतीच्या वेळी जेवढा उजेड असतो तेवढा अंधूक उजेड होता. गुरुवारीही असाच पाऊस कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने  मुंबई शहर , उपनगरे , ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हा भागात बुधवारी आणि गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार मुलुंड पश्चिमेकडच्या भागात गेल्या 24 तासात 215 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मंत्रालय परिसरात गेल्या 24 तासात 160.75 मिलिमीटर पावसाची तर दादर पूर्व इथे गेल्या 24 तासात 341.84 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. अंधेरी पूर्वेकडच्या भागात गेल्या 24 तासात 282.65 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.