थिएटर सुरू झाली तर झळकणार नाही अक्षयचा ‘सूर्यवंशी’, वाचा काय आहे कारण….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक सार्वजनिक स्थळांचा कुलूपबंद करण्यात आलं आहे. त्यात सिनेमागृहे आणि नाट्यगृहांचा समावेश आहे. अनलॉक प्रक्रियेअंतर्गत 15 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहं उघडतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. थिएटर उघडल्यानंतर कोणता चित्रपट प्रदर्शित होणार, याची उत्सुकता तमाम प्रेक्षकवर्गाला लागली आहे.

या यादीत सर्वात वरचा क्रमांक अक्षय कुमार अभिनित आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी या चित्रपटाचा आहे. कारण, लॉकडाऊन घोषित होण्यापूर्वी मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. हा चित्रपट सुपरहिट ठरण्याचा अंदाज होता. पण, कोरोनामुळे सगळंच गणित फिस्कटलं. आता जेव्हा थिएटर्स पुन्हा उघडतील तेव्हा हा चित्रपट सर्वात आधी, दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल असा अंदाज होता, कारण तो बनून तयार होता. पण, हा चित्रपट आता चित्रपटगृहांमध्ये दिसेल अशी शक्यता धुसर आहे.

कारण, चित्रपट निर्मात्यांच्या मते हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करून फारसा फायदा होणार नाही. कारण, अनलॉक प्रक्रियेअंतर्गत थिएटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अनेक राज्यांमध्ये अद्याप त्याला परवानगी दिलेली नाही. महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्रप्रदेश अशा राज्यांमध्ये जिथे चित्रपटांची क्रेझ तुलनेने जास्त आहे, तिथे अद्याप सिनेमागृहं उघडण्यात आलेली नाहीत. त्यामुळे चित्रपटाच्या तिकीटबारीवर याचा परिणाम होईल, अशी भीती निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरही सूर्यवंशी प्रदर्शित करण्यास निर्मात्यांची तयारी नाही. कारण, यापूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यात शकुंतला देवी, गुलाबो सिताबो, गुंजन सक्सेना अशा बहुचर्चित चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे ओटीटी हा पर्याय निर्मात्यांनी वगळायचं ठरवलं आहे. सध्या दिवाळी ऐवजी डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित करावा का, याविषयी निर्मात्यांचा विचार सुरू असल्याचं वृत्त आहे.

पाहा सूर्यवंशीचा ट्रेलर-