
बिहार विधानसभा निवडणुकीत रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने स्वबळाचा नारा दिला आहे. जनता दल युनायटेडचे (जदयू) प्रमुख नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक न लढवण्याचा निर्णय दिल्ली येथे झालेल्या पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. लोजपाच्या भाजपाबरोबर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, तर जदयू उमेदवारांविरोधात सर्व जागा लढवण्यात येतील असे लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी सांगितले.
बिहार निवडणूक स्वबळावर लढत असलो तरी निवडणुकीनंतर गरज भासल्यास भाजपाबरोबर मिळून सरकार बनवू शकतो असेही चिराग पासवान यांनी सांगितले. भाजपाशी युती करण्यास तयार असल्याचा प्रस्तावही त्यांनी या बैठकीत मंजूर केला. जदयूबरोबर वैचारिक मतभेद झाल्यामुळेच लोजपाने वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्याचे पक्षाचे सरचिटणीस अब्दुल खालिक यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी लोजपाने ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ हे व्हिजन ठेवले आहे.
रामविलास यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांच्यावर शनिवारी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. गरज पडली तर काही आठवड्यांनी अजून एक ऑपरेशन करावे लागण्याची शक्यता आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
जदयू-भाजपाचे फिफ्टी-फिफ्टी
लोजपाने स्वतंत्र लढण्याचा विचार केल्याने जदयू-भाजपाने जागा वाटपाचा फिफ्टी-फिफ्टी फॉम्र्युला ठेवला आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी जदयू आणि भाजपाने 119-119 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्वतील पाच जागा या जीनतराम मांझी यांच्या हम पक्षाला देण्यात येणार आहेत.























































