Me टाईम मिळाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्नेहलता वसईकर (अभिनेत्री)

चित्रकला, पाककला, व्यायाम यात सक्तीची सुट्टी सत्कारणी लागली. त्यामुळे आता पुन्हा उत्साहाने सगळय़ा नियमांचे पालन करून कामाला लागले आहे.

खरंतर एरव्ही घरी असणं आणि लॉकडाऊनमध्ये घरी असणं यात फरक होता. यावेळी पूर्णपणे घरी राहायचे होते. पण तो वेळ सत्कारणीच लागला. मला पेण्टिंग करायला आवडत असल्यामुळे या काळात मी भरपूर पेण्टिंग केलं. विशेष म्हणजे माझी मुलगी शौर्या हिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता आला. त्यामुळे वेगळं काही करण्याची गरजच लागली नाही. पण या सगळ्याच माझं एक ठरलेलंच होतं ते म्हणजे नियमित व्यायाम. टॉप फ्लोअरला राहत असल्याने आमच्या घराच्या वरतीच टेरेस आहे. तिथे कधी पाच ते सहा, सहा ते सात या वेळेत वर्कआऊट करायचे. यावेळी एक प्रकर्षाने पाळलं होतं की जेव्हा वर्कआऊट करायचे तेव्हा म्युझिक ऐकायचे नाही. टेरेसवर गेल्यावर पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱयाचा विशिष्ट आवाज असतो ते ऐकत व्यायाम करायचे. जिममध्ये गेल्यावर किंवा वर्कआऊट करायला गेल्यावर लोकांना सतत कानात एक प्रकारचं म्युझिक लागतं. खरंतर त्याची गरज नसते याची जाणीव झाली. तुम्ही स्वतःबरोबर किती राहू शकता ना हे मला या लॉकडाऊनने शिकवलं की कुठल्याही परिस्थितीत तुमचा ‘मी’ टाइम आहे तो काढता आला पाहिजे. तो कसा काढायचा हे लॉकडाऊनने शिकवून दिलं.

सेटवरही आमची पूर्णपणे काळजी घेतली जाते, सोशल डिस्टंसिंग पाळलं जातं. सेटच्या किंवा लोकेशनच्या प्रवेशद्वारावरच टेम्परेचर, ऑक्सिमीटर तपासलं जातं आणि त्यानंतर तिथले हॅण्डग्लोज, मास्क देऊन आत सोडलं जातं. तसेच आधी मेकअपरूममध्ये दोन किंवा तीन कलाकार एका रूममध्ये असायचे पण आता तसे नाहीय. लहान रूम असेल तर एक किंवा दोघं असले तरी अंतर ठेवून असतात. त्याचबरोबर मीही माझी काळजी घेत घरातून माझा डबा, पाण्याची बाटली, एक एक्स्ट्रा कपडय़ांचा जोड, स्टीमर, सॅनिटायझर या गोष्टी सोबत ठेवते. कलाकर हे सगळ्यात मोठय़ा रिस्कमध्ये आहेत. कारण शूटिंगच्या सेटवर बाकीच्या गोष्टी मास्क घालून करू शकता. पण कलाकारांना जेव्हा सीन करायचा असतो तेव्हा मास्क हा काढावाच लागतो आणि त्यामुळे मी माझ्या मेकअप रूममध्ये स्टीमर ठेवलेलाच असतो तिथे मी माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथून बाहेर पडण्यापूर्वी स्टीम करून घेते आणि मग बाहेर पडते. त्याचबरोबर मी स्वतःसाठी एक सॅनिटायझर स्प्रे घेऊन जाते जो स्वतः मी काही गोष्टी हाताळल्या की त्यावर स्प्रे करते. गाडीतून उतरल्यावर संपूर्ण गाडी सॅनिटाइज करते. घरी आल्यावर सगळ्या वस्तू बाहेरच्या एका विशिष्ट जागी ठेवून आधी आंघोळीला जाऊन मग सगळ्या त्या वस्तू एक एक सॅनिटाइज करते. आता न्यू नॉर्मल म्हणून या गोष्टी सतत होऊ लागल्या आहेत. पण हल्ली मला ऑनलाइन एक गोष्ट सापडली ती म्हणजे मिस्ट स्प्रे बॉटल. ज्यात तुमंच सॅनिटायझर भरू शकता आणि ते असेही वापरू शकतो किंवा चार्ंजग करूनही वापरू शकता. ते बटण ऑन केलं की त्याने तुमच्या नोटा, गाडीची चावी या छोटय़ा छोटय़ा गोष्टी सॅनिटाइज करणं सोपं जातं. तो इतका हॅण्डी आहे की मला माझ्या पर्समधून कॅरी करता येतो.

कोरोनामुळे सगळ्यांना सकस आहाराची किंमत कळली. माझ्या घरात हे आधीपासूनच आहे. आमच्या घरात तुपाचा वापर खूप असतो. तूप असचं खाणंही आमच्या सवयीत आहे. हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, खजूर आमच्या खाण्यात असतं. गरम पाणी, ग्रीन टी हे रोजच्या दिनचर्येत आहे, सकाळी उठल्यावर एक कप गरम पाणी, लिंबूपाणी घेतो. प्रथिनयुक्त आहार आमचा जास्त असतो. व्हीटॅमिन सी आम्ही याआधी पण घेत होतो पण आता नियमित घेतो. तसेच आहाराबरोबरच कोरोनाने स्वच्छतेकडे जास्त काळजीपूर्वक बघायला शिकवलं आणि कमीतकमी गोष्टीत तुम्ही कसे जगू शकता हे शिकवलं