
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या रिया चक्रवर्तीला हायकोर्टाने आज दिलासा दिला. ड्रग्स डिलिंगशी रियाचा थेट संबंध दिसून येत नाही, तिची गुन्हेगारी पार्श्वभूमीदेखील नाही एवढेच काय तर ड्रग्ससाठी तिने पैसे पुरवल्याचे पुरावेदेखील नाहीत असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी आज रियाचा जामीन मंजूर केला. 1 लाखाच्या जातमुचलक्यावर तिची सशर्त सुटका झाली आणि भायखळा तुरुंगात असलेली रिया तब्बल 29 दिवसानंतर आज सायंकाळी उशिरा बाहेर आली.
रियाला जामिन मंजूर झाल्यानंतर पोलिसांनी पहिल्यांदा दम भरला तो वृत्तवाहिन्यांना जेलमधून बाहेर आल्यानंतर रियाचा पाठलाग करू नये पिंवा रस्त्यावर सिंग्नलला गाडी उभी असताना तेथे जाऊन तिची मुलाखत पिंवा व्हीज्युअल्स घेणे कायद्याने गुन्हा आहे. तेव्हा चालकच नाही तर त्याला सूचना देणाऱयावरही कडक कारवाई करू, अशी ताकीदच पोलिसांनी दिली. त्यामुळे रियाचा पाठलागाची तयारी करणाऱया देशी पापाराझींनी स्वतःला आवर घातला.
ड्रग्स प्रकरणी शोविकला 5 सप्टेंबर रोजी एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो)अटक केली तर रियाला 9 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. एनडीपीएस कोर्टाने तिचा जामीन अर्ज नाकारल्याने रिया सह शोविक चक्रवर्तीने सुटकेसाठी अॅड सतीश मानेशिंदे यांच्या मार्फत हायकोर्टात अर्ज केला होता तर सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचा नोकर दिपेश सावंत आणि अब्दुल बासित परिहार यांनीही हायकोर्टात अर्ज केले होते. या जामीन अर्जावर आज न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी न्यायालयाने रियासह सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंतचा जामीन अर्ज मंजूर केला.
रियाला घातलेल्या अटी
हा अर्ज मंजूर करतानाच रियाला न्यायालयाने काही अटी घातल्या त्यानुसार जामीनावर सुटल्यानंतर रियाने पुराव्यांशी छेडछाड करू नये किंवा एनसीबीच्या चौकशीत, तपासात हस्तक्षेप करू नये, रियाने पहिले 10 दिवस दररोज सकाळी 11 वाजता जवळच्या पोलिस ठाण्यात हजर राहावे तसेच पुढील सहा महिने महिन्याच्या पहिल्या दिवशी एनसीबीसमोर उपस्थित राहण्याचे हायकोर्टाने आदेशात नमूद केले आहे. रियाला एनसीबी व केंद्रीय तपास यंत्रणेच्या परवानगीशिवाय मुंबई सोडून जाता येणार नाही. परदेशात जाण्यासाठीही तिला एनडीपीएस कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांची परवानगी घेणे बंधनकारक राहील असे हायकोर्टाने आदेशात म्हटले आहे.
हायकोर्टाचे निरीक्षण
एनडीपीएस कायद्याच्या कलम 27-अ अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार 10 वर्षापर्यंत तुरूंगवासाची तरतूद असून गुन्हा अजामीनपात्र आहे. मात्र, कायद्यानुसार एखाद्या विशिष्ट अंमली पदार्थासाठी पैसे देणे अथवा एखादा अंमली पदार्थ विकत घेणे म्हणजे सदर व्यवसायाला वित्त पुरवठा करणे असा होत नाही. कायद्यासमोर प्रत्येक नागरिक समान असून कोणत्याही सेलिब्रिटीला कोर्टासमोर विशेषाधिकार देता येत नाहीत. समाजात संदेश जावा यासाठीच अकारण शिक्षाही देता येता नाही. प्रत्येक प्रकरण वेगळे असून आरोपी कोणत्या पार्श्वभूमीचा आहे हे न पाहता प्रकरण हाताळणे आवश्यक असते
दीपेश सावंत, मिरांडा यांची सुटका
सॅम्युअल मिरांडा व दीपेश सावंत हे या प्रकरणात सक्रिय नसून त्यांनी सुशांत किंवा रियाच्या सांगण्यावरून ड्रग्स आणण्याचे काम केले आहे. म्हणूनच त्यांना जामीन अर्ज स्वीकारण्यात आल्याचे हायकोर्टाने निकालपत्रात नमूद केले आहे.
भाऊ शौविक मात्र अद्याप कोठडीतच
हायकोर्टाने मात्र रियाचा भाऊ शौविक व अब्दुल बसिर परिहार या दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.




























































