महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय, उत्तर पत्रिकेची स्कॅन इमेज उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इतके गुण मिळतील अशी अपेक्षा होती पण कमीच मिळाले. परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या मनात ही शंका कायम राहते. त्या शंकेला जागा नको आणि कुशंकेलाही वाव नको म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक मोठा निर्णय घेतला आहे. मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेजच उमेदवाराच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये उपलब्ध करू दिली जाणार आहे.

एमपीएससीने यासंदर्भात परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे. एमपीएससीच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन दरवर्षी केले जाते. त्या परीक्षांचे पेपर हे बहुपर्यायी स्वरुपाचे असतात. त्यासाठी उमेदवारांना दोन भागांची उत्तरपत्रिका देण्यात येते. एक मूळ प्रत असते आणि दुसरी कार्बन प्रत. मूळ प्रत ही आयोगाकडे जमा केली जाते तर कार्बन प्रत उमेदवारांना देण्यात येते. त्यावरून आपल्याला किती गुण मिळू शकतात याचा अंदाज उमेदवारांना घेता येतो. त्यानंतर अनेकांच्या मनात शंकाकुशंका कायम असतात.

गुणांची मेरीटही मिळणार

उमेदवारांना त्यांना मिळालेले अचूक गुण कळावेत यासाठी परीक्षेच्या निकालानंतर मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालाकरीता गृहित धरण्यात आलेले एकूण गुण आणि उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीता लावण्यात आलेली मेरीट ही माहिती त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबर 2020 नंतर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा आणि चाळणी परीक्षांसाठी हा निर्णय लागू होणार आहे.