
सध्या बाजारात विविध प्रकारच्या सॅनिटायझरची विक्री होत आहे. कोणता सॅनिटायझर चांगल्या दर्जाचा आहे हे ग्राहकांना बिलकूल लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांची फसगत होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर बनवताना अल्कोहोलचे प्रमाण किती असावे, उत्पादन करण्याबाबतचा परवाना, उत्पादन व्यवस्था यासह उपलब्ध असलेल्या सॅनिटायझरचा गुणात्मक दर्जा तपासावा या मागणीचे निवेदन माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन दिले.
कोरोना महामारीच्या भीतीमुळे सर्वसामान्य नागरिक कोणताही विचार न करता सॅनिटायझरची खरेदी करतात. मात्र बाजारात मिळणाऱया सॅनिटायझरचा दर्जा काय, असा सवाल डॉ. दीपक सावंत यांनी उपस्थित केला आहे. सध्या झोपडपट्टय़ांमध्येही सॅनिटायझर बनवण्याचे कारखाने सुरू असून त्याची कुठेही विक्री केली जात आहे. सॅनिटायझर कुणी तयार करावे, कुठे विकावे याबाबत कायदेशीर नियमावली हवी असेही त्यांनी स्पष्ट केले.
पल्स ऑक्सिमीटरचाही दर्जा तपासावा
बाजारात 300 रुपयांपासून दोन हजार रुपये किमतीचे पल्स ऑक्सिमीटर विकले जात आहेत. त्याचा दर्जा काय आहे हे एफडीएने तपासून प्रमाणित करावे अशी सूचना डॉ. दीपक सावंत यांनी केली. कारण एकाच व्यक्तीचे दोनदा रीडिंग घेतल्यास त्यामध्ये तफावत येत असल्याचे डॉ. शिंगणे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पल्स ऑक्सिमीटर योग्य दर्जाचे आहेत का हे उत्पादन करणाऱया कंपन्यांमध्ये भेट देऊन तपासावे अशीही मागणी केली. दरम्यान, या सर्क बाबींचा आपण अभ्यास करून योग्य कार्यवाही करू असे आश्वासन डॉ. शिंगणे यांनी दिले.




























































