
मुंबईत झाडांवर होणारी बॅनर, पोस्टरबाजी लवकरच बंद होणार आहे. याबाबत शिवसेनेने प्रस्ताव मांडला आहे. याला पालिका सभागृह आणि आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने अंमलबजावणी होणार आहे. यामुळे झाडे वाचवण्यास मदत होणार आहे.
मुंबईत निवडणुका, राजकीय नेत्यांचे दौरे, सभा, राजकीय समारंभ, भाषणे, सणासुदीला झाडांवर मोठय़ा प्रमाणात बॅनर्स, पोस्टर्स, जाहीरात फलक लाकले जातात. झाडांवर जाहिरातबाजी करताना खिळे ठोकण्यात येतात. तारा बांधण्यात येतात. परंतु ठोकलेले तारा-खिळे तसेच राहत असल्याने झाडे कमकुवत होतात आणि कालांतराने झाडे मरण पावतात. यामुळे पर्यावरणाला मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. तर झाडांप्रमाणे इमारतींच्या भिंतीवर जाहिरात करणारे फलक, पोस्टर्स चिकटवले जातात. यामुळे मुंबई शहर विद्रूप दिसू लागते. त्यामुळे झाडे, इमारतींच्या भिंती अशा ठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स लावण्यास मनाई करणारा कायदा अधिक कठोर करावा, झाडांवर खिळे-तारा ठोकण्यास बंदी घालावी अशी ठरावाची सूचना शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी मांडली आहे.
…तर कठोर कारवाई होणार
नगरसेवक अमेय घोले यांच्या ठरावाच्या सूचनेवर पालिका सभागृहात चर्चा केली जाणार असून सभागृहाच्या मंजुरीनंतर आयुक्तांच्या अभिप्रायासाठी प्रस्ताव पाठवला जाईल. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर लवकरच अंमलबजावणी होईल. यानंतर झाडावर असे फलक लावल्याचे आढळल्यास दंडासह कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.





























































