
लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक- अध्यक्ष, केंद्रीय ग्राहकव्यवहार, अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांचे दिल्लीतील खासगी रूग्णालयात निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी पासवान यांच्यावर हृदयशस्रक्रिया करण्यात आली होती. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पुत्र खासदार चिराग पासवान यांनी ट्विटद्वारे माहिती दिली.
बिहारमधील महत्त्वाचे दलित नेते असलेले रामविलास पासवान तब्बल आठ वेळा लोकसभेचे खासदार होते. सध्या ते राज्यसभेचे सदस्य होते. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाच्या नेत्याचे निधन झाल्यामुळे बिहारमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त होत आहे.
संयुक्त सोशालिस्ट पार्टीतून पासवान यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. 1974ला ते पहिल्यांदा बिहार विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर 1977 पासून ते सलग संसदेत होते. लोकदल, जनतापार्टी, जनता दल आणि लोकजनशक्ती पार्टी असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या मंत्रिमंडळात ते कामगार मंत्री होते. एच. डी. देवेगौडा मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री, दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी मंत्रिमंडळात पासवान हे माहिती -तंत्रज्ञान, कोळसा-खाण मंत्री होते. डॉ. मनमोहनसिंग यांच्या दहा वर्षांच्या काळात त्यांनी विविध खात्यांचे मंत्रीपद संभाळले. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात रामविलास पासवान हे ग्राहकव्यवहार, अन्न व नागरीपुरवठा मंत्री होते.
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्या निधनाने दु:ख झाले. राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवान यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती, त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला आहे. – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
























































