
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था ढासळत आहे. सामाजिक शांतता नाही. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. सध्या देशात जे काही सुरु आहे, त्यावरुन देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे. त्यामुळे देशात बेबंदशाही निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा माजी केंद्रिय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपध्दतीवर टिका करताना दिला.
माजी केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवार कै. सुधाकरपंत परिचारक, भाागवताचार्य वा.ना. उत्पात, ह.भ.प. रामदास महाराज जाधव, कै. राजुबापु पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुबियांची सांत्वनपर भेट शिंदे यांनी घेतली. यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
देशात हाथरस सारखी एक नाही अनेक प्रकरणे घडली आहेत. येथे सामाजिक विचार खाली गेलेला आहे. गरीब माणसाला येथे राहणे मुश्किल झालेले आहे. आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे आता नवीन तरुणांना काही वाव राहिलेला नाही. त्यामुळे देशातील विस्कटलेल्या सर्व विरोधी पक्षांनी देशहितासाठी आता एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले.
तसेच सध्या सुरु असलेल्या आरक्षण प्रश्नावर काही मंडळी भडक विधाने करुन समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
अभिनेता सुशांतसिंग प्रकरणात सोशल मीडियातून काही फेक अकाऊंट बनवून मुंबई पोलिसांची बदनामी केली. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा मलाही फटका बसला असल्याचे सांगितले. तसेच सोशल मीडियाचा वापर विचार करुन करावा, असा सल्ला त्यांनी दिला.






















































