
तुळजापूर येथे काल शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी आयोजित मराठा क्रांती मोर्चामध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्यांंनी अनेक कार्यकर्त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन, मोबाईल यासह रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून पाच चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
तुळजापूर शहरात शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण मोर्चा संदर्भात तुळजाभवानी मंदीर महाद्वारासमोर जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती. यामध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी गळ्यातील 65 ग्रॅम सोन्याचे दागिने, खिशातील रोख रक्कम असा माल चोरी केला होता. यावरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात कलम- 379, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखा व तुळजापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने आकाश भगवान काळे (32), गजानन आकाश करंजकर (28, दोघे रा. सुळ गल्ली, लातूर), दत्ता वसंत गिरी (रा. बाभळगाव, जि. लातुर), मयुर संजय मस्के (रा. लातुर), सिध्दार्थ संजय जाधव (रा. शिरापुर, ता. शिरुर) यांना ताब्यात घेऊन चोरीच्या मालापैकी 13 हजार 500 रु. रोख व चोरीच्या दोन मोबाईल फोनसह गुन्हा करण्यास वापरलेली हिरो एचएफ डीलक्स मोटारसायकल जप्त केली आहे.






























































