
शिवसेनेचे खेड तालुक्यातील माजी आमदार सुरेश नामदेव गोरे (57) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी, चुलते, पुतणे असा परिवार आहे.
गोरे यांना कोरोनाची लागण झाली होती. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या 20 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. शांत, मनमिळाऊ स्वभावामुळे गोरे यांनी राजकारणात आपला ठसा उमटविला होता. गोरे हे ‘भाऊ’ या टोपणनावाने सर्वत्र परिचित होते. खेड तालुक्यात एक संयमी नेतृत्व म्हणून गोरे यांची ओळख होती. गोरे यांची राजकीय कारकीर्द अत्यंत वेगवान राहिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यामुळे येथे नेहमीच पवारांच्या विचारांचा आमदार निवडून गेल्याचा अनेक वर्षांचा इतिहास होता. मात्र, 2014 साली गोरे यांनी राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते-पाटील यांचा पराभव करीत खेड तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकविला. गोरे यांच्या रूपाने खेड तालुक्याच्या इतिहासात शिवसेनेचा पहिला आमदार होण्याची नोंद झाली.
कोरोनाकाळातही गोरे यांनी जनसंपर्क, सामाजिक उपक्रम कायम ठेवले होते. याच वेळी त्यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर सर्वप्रथम चाकण येथील एका खासगी रुग्णालयात, त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावत गेल्यामुळे त्यांना अखेर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तेथे गोरे यांचे निधन झाले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. विरोधकांवर संयमी टीका करणारा हा नेता सदैव हसतमुख असायचा. कार्यकर्त्यांच्या गराडय़ात कायम असणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.


























































