जालन्यात परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा; कापूस, सोयाबीनचे मोठे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवार आणि रविवारी झालेल्या परतीच्या पावसाने जालना जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील मंठा, परतुर, घनसावंगी, अंबड, जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद आदी तालुक्यात सोयाबीनसह इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मंठा तालुक्यातही सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने ओढे, नाले पाण्याने तुडूंब भरले. तर घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी परिसराला झोडपून काढले. ढगांचा गडगडाट, आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने वेचणीला आलेला कापूस आणि काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारनंतर अचानक पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतात कापूस वेचत असलेले व सोयाबीनचे मळणीयंत्रामार्फत खळे सुरू केलेल्या शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. रिपाच्या सोयाबीन, बाजरी, कापूस, तूर, मका यासह मोसंबी, डाळिंबाच्या फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.