
वीज दरवाढ निश्चित करताना वीज नियामक आयोगाकडून झालेल्या चुकीचा आर्थिक भुर्दंड भूमिगत वीज वाहिनीतून नवीन वीज कनेक्शन घेणाऱया ग्राहकांना बसत आहे. वीज जोडणी शुल्क निश्चित करताना याआधीच्या ग्राहक गटाप्रमाणे पाच किलोवॅट पर्यंतच्या लोडसाठी ग्राहकाला तीन हजार चारशे रुपये शुल्क आकारावे असा उल्लेख असणे आवश्यक होते. मात्र आयोगाकडून 5 किलोवॅटपर्यंत ऐवजी 0.5 किलोवॅटपर्यंत असा उल्लेख झाल्याने त्यापेक्षा जास्त वीज लोड हवा असलेले ग्राहक पूर्वीच्या तुलनेत दुप्पट शुल्काच्या गटात गेले आहेत. त्यामुळे महावितरणने ही चूक वीज आयोगाच्या निदर्शनास आणून देणे आकश्यक होते. मात्र तसे न करता महावितरणने पूर्वी पाच किलोवॅटसाठी 3 हजार शंभर रुपये एवढे कमी शुल्क असतानाही वीज आयोगाच्या निर्णयाचा आधार घेत दुप्पट म्हणजे 7 हजार सहाशे रुपये एवढे जास्त शुल्क वसूल केले जात असल्याचे समोर आले आहे. ही बाब वीज आयोगाच्या नजरचुकीने झाली असल्याची शक्यता असल्याचे जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी सांगितले.



























































