
टीम इंडियाचे पहिले विस्फोटक खेळाडू म्हणून ज्यांचे नाव क्रीडा विश्वात आदराने घेतले जाते त्या विजय मर्चंट यांचा आज जन्मदिन. मर्चंट यांच्या नावावरच ‘विजय मर्चंट ट्रॉफी’ ही अंडर 16 खेळाडुंसाठी स्पर्धा खेळवली जाते.
12, ऑक्टोबर 1911 ला मुंबईत जन्मलेल्या विजय मर्चंट यांनी प्रथमश्रेणी क्रिकेट अक्षरशः गाजवले. कसोटीमध्ये त्यांची आकडेवारी विशेष प्रभावी नाही. मात्र त्याकाळी मर्चंट यांच्यासमोर गोलंदाजी करताना भल्या-भल्या गोलंदाजांना घाम फुटायचा. लिटल मास्टर सुनील गावस्कर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे दिग्गज खेळाडूही मर्चंट यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. मर्चंट यांचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपले सर्व आंतरराष्ट्रीय सामने इंग्लंड संघाविरुद्ध खेळले.
‘क्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार, विजय मर्चंट यांनी आपला पहिला कसोटी सामना 1933 ला इंग्लंड संघाविरुद्ध खेळला. तर अखेरचा सामना 18 वर्षांनी 1951 ला खेळला. दिसायला मोठे वाटणाऱ्या या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी फक्त 10 सामने खेळले. यात त्यांनी 47.72 च्या सरासरीने 859 धावा केल्या. यात त्यांच्या 3 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. मर्चंट हे आक्रमक खेळीसाठी ओळखले जात असले तरी कारकिर्दीत एकही सामना जिंकू न शकल्याचे दुःख त्यांना कायमच बोचत राहिले.
प्रथमश्रेणी क्रिकेटचे ‘ब्रॅडमन’
कसोटी क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी करू न शकलेल्या मर्चंट यांनी प्रथमश्रेणी क्रिकेट मात्र गाजवले. प्रथमश्रेणीच्या 150 लढतीत त्यांनी 71.64 च्या सरासरीने 13,470 धावा चोपल्या. यात त्यांच्या 45 शतकांचा आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 359 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच रणजी ट्रॉफीमध्ये त्यांची सरासरी 98.75 आहे. प्रथम श्रेणीच्या सरासरीचा विचार केल्यास त्यांच्या पुढे फक्त सर डॉन ब्रॅडमन (95.14) आहेत. त्यामुळे मर्चंट यांना टीम इंडियाचे ‘ब्रॅडमन’ असेही म्हटले जाते.
इंग्लंडचा मर्चंट यांच्यावर होता डोळा
विजय मर्चंट यांच्या फलंदाजीचे 40 ते 50 च्या दशकात लाखो दिवाने होते. इंग्लंडचे महान खेळाडू सीबी फ्राई यांनी तर मर्चंट यांना पांढरा रंग लावून आमच्या संघात घेऊ आणि सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरवू, असे म्हंटले होते.

























































