
कोरोना विषाणूच्या विळख्यातून जगाला सोडवण्यासाठी संशोधक लस मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. अद्याप कोणती लस कोरोनाला प्रतिबंध करू शकते, यावर संशोधन पूर्ण झालं नसलं तरी त्याचा एक महत्त्वाचा टप्पा संशोधकांनी पार केला आहे. जगात प्रथमच कोरोना या विषाणूची संरचना दाखवणारा फोटो मिळवण्यात संशोधकाना यश आलं आहे.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना विषाणूचा फोटो मिळवल्यानंतर त्याच्यावर इलाज आणि लसीकरणाच्या संशोधनासाठी खूप मोठी मदत मिळणार आहे. कोरोना विषाणूचा पहिला फोटो चीनच्या त्सिगुआ विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ साई ली हांगझोऊ यांनी आणि यांच्या पथकाने मिळवला आहे. त्यांनी कोरोना विषाणू ला एका विशिष्ट रसायनात टाकलं, जेणेकरून तो नुकसान पोहोचवू शकणार नाही. मग या तरल रसायनाचं परीक्षण करण्यासाठी त्याला आधी गोठवण्यात आलं. मग त्या रसायनाला क्रयो इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाखाली ठेवण्यात आलं. त्यामुळे त्याचे फोटो मिळवणं संशोधकांना सोपं गेलं.
ली यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गोठवलेल्या त्या रसायनात कोरोना व्हायरस संपूर्णपणे पसरलेला आम्हाला दिसला. त्यांची रचना एका इंचाच्या दहा लाखाव्या भागाहून ही छोटी होती. हा विषाणू टोकदार आकाराचा आहे. मी पहिला असा माणूस असेन ज्याने हा विषाणू इतक्या जवळून पाहिला. या फोटोंवरून संशोधकांना हा विषाणू प्रथिनांच्या कवचाच्या सहाय्याने मानवी पेशीत नेमका कसा घुसतो ते कळलं आहे.
या फोटोवरून संशोधकांना हेही कळलं आहे की कोरोना सारख्या घातक विषाणूमुळे तयार झालेली गुणसूत्र मानवी शरीरातील जैव रसायन रचनेवर कशा प्रकारे परिणाम करतात. विषाणुवरील प्रथिनांचे कवच आपल्या पेशींच्या निर्मितीवर परिणाम करतात आणि त्याचा आधार घेऊन नवीन विषाणू बनवायला सुरुवात करतात. काही शास्त्रज्ञ याचा वेग जाणून घेण्यासाठी कॉम्प्युटरवर वर्चुअल व्हायरस तयार करत आहेत. त्यामुळे या विषाणूचा मानवी शरीरातील वाढीचा वेग निश्चित केला जाऊ शकतो.


























































