
मसोली परिसरातून सोहाळेमध्ये अवतरलेल्या हत्तीने सोमवारी पहाटे चक्क आजरा शहरातच प्रवेश केला. सोमवारी पहाटे सव्वा-पाचच्या सुमारास आजरा शहराच्या नबापूर गल्लीकडील पाठीमागील बाजूस त्याने लावलेली हजेरी शहरवासीयांचे धाबे दणाणून सोडणारी ठरली. यासाठी त्याने हिरण्यकेशी नदीचे पात्र चक्क दोनवेळा पार केले. या दरम्यान त्याने परिसरातील भट, केळी, ऊस आदी पिकांत धुडगूस घालत मोठे नुकसान केले. दरम्यान, हत्तीची ही भल्या पहाटेची एन्ट्री आज सकाळपासूनच आजरा शहरवासीयांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
रविवारी सोहाळे परिसरात पीक नुकसान केलेला हत्ती सुलगाव परिसरात मुक्काम करून होता. पण आज पहाटे हिरण्यकेशी नदीकाठच्या आमराई गल्ली व नबापूर गल्लीमागील बाजूने शेतातून निघून गेला. पहाटे सव्वा पाचच्या दरम्यान येथील ग्रामसेवक दिलीप डोंगरे नेहमी फिरायला जातात. आज मात्र अंधुकशा प्रकाशात केवळ दहा फुटावर हत्ती असल्याचे कळले. रस्त्यावरील वीजेचे दिवेही नव्हते, त्यामुळे आकृतीच्या दिशेने बॅटरीचा झोत टाकला असता त्यांना हत्ती दिसला. प्रसंगावधान राखत त्यानी आजूबाजूच्या लोकांना जागे केले. हत्ती नबापूर गल्लीतून गेला, पण तेथील कसलेही नुकसान झाले नाही. मात्र शेतातून हत्ती गेल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या, हत्ती हिरण्यकेशी नदी ओलांडून पुन्हा एकदा सुलगांव परिसरात गेला आहे. दरम्यान, एरव्ही जंगल व शेतीवाडी परिसरात उतरणारा हत्ती चक्क गल्लीनजीक आल्याची माहिती मिळताच त्याच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत होते.
सावधान..! हत्ती मानवी वस्त्यांलगत वावरतो आहे.
आजरा शहराच्या ग्रामीण रुग्णालयाच्या मागे कर्पेवाडी बागेत हत्तीचा वावर कायम आहे.
तीन वर्षापूर्वी आजरा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीत हत्ती दिवसाढवळ्या प्रवेशला होता.
आंबोली मार्गावर शहरालगत हॉटेल मिनर्व्हाच्या मागील बाजूकडेही हत्ती नेमाने येतो.
महिनाभरापूर्वी हत्ती चक्क मसोली या शहराजवळच्या गावच्या गल्लीतून रात्री साडेआठ वाजता गेला.
तर शहरातील विद्यानगर कॉलनीचा रस्ता आयटीआय मार्गे पार करीत शिवाजी नाईक यांच्या घराजवळ हत्ती प्रकटला होता.























































