
पुणे शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे महिला, मुली, जेष्ठ नागरिक भीतीखाली आहेत. चंदननगर भागात अशीच एक घटना घडली असून पायी निघालेल्या तरुणीला दीदी हेल्प हवी आहे का, अशी विचारणा करून दुचाकीस्वार चोरट्यानी तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. ही घटना काल संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली असून याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी वडगाव शेरी परिसरात राहण्यास आहेत. काल संध्याकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास त्या मुंढवा-खराडी बायपास रोडने पायी चालत निघाल्या होत्या. त्यावेळी एच.पी. पेट्रोल पंपासमोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी दीदी काही हेल्प हवी आहे, अशी विचारणा केली. त्यामुळे त्यामुळे तरुणीने मान वळवली असता दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. तरूणीने आरडाओरडा केला. पण काही मिनिटात चोरटे पसार झाले होते. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव करत आहेत.





























































