
मुंबईत ऑगस्टअखेर पुन्हा सुरू झालेली रुग्णवाढ महिनाभरात आटोक्यात आली आहे. यामध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी 58 दिवसांवरून 69 दिवसांवर पोहोचल्यामुळे 11 दिवसांनी वाढला आहे. विशेष म्हणजे सध्याच्या 22 हजार 369 सक्रिय रग्णांपैकी 13 हजार 259 रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे कोरोना आटोक्यात आला असून मुंबई नियंत्रणात असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.
मुंबईत 10 ऑक्टोबर रोजी एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 227251 पर्यंत पोहोचली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता वाढले असल्याचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. तर मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या 7665 रुग्णांची प्रकृतीही सुधारली असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. 11 सप्टेंबर रोजी मुंबईत एकाच दिवसांत 26 हजार 632 रुग्ण आढळले होते. मात्र 11 ऑक्टोबर रोजी 22 हजार 369 कोरोबाधित आढळले. यामध्ये एका महिन्यात मृत्यूदरही 2.1 टक्क्यांनी कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74 टक्क्यांवरून 85 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत 1445 रुग्णांच्या प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.
पाच हजार बेड रिक्त
पालिकेची रुग्णालये आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये 11 सप्टेंबर रोजी 85 आयसीयूसह रिक्त बेडची संख्या 4165 होती. 11 ऑक्टोबर रोजी रिक्त बेडची संख्या 257 आयसीयू बेडसह 4922 बेड असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
एका महिन्यात पावणेचार लाख चाचण्या
पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार्या चाचण्यांची संख्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत वाढले आहे. मार्चपासून 11 सप्टेंबरपर्यंत मुंबईत एकूण 8 लाख 87 हजार चाचण्या झाल्या होत्या. मात्र 11 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 3 लाख 74 हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सप्टेंबरमध्ये दररोज होणार्या 7 हजार चाचण्यांचे प्रमाण आता दररोज 16 ते 18 हजारांपर्यंत वाढण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
























































