मधवेळ खाणं..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)

साधारणपणे न्याहारी आणि जेवणात काय खावं, काय खाऊ नये याबाबतीत सर्वच काळजी घेतात, पण मधल्या वेळेत किंवा चहा, कॉफीसोबत काहीतरी चटपटीत, कुरकुरीत खावंसं वाटतं. मग आपण अनेक वेळा बिस्कीट, चिवडा, नमकीन, वेफर्स अशा अनेक गोष्टी तोंडात टाकतो. काही जण हेल्थी खावं म्हणून मल्टिग्रेन बिस्कीट, टोस्ट, गव्हाचे तयार पदार्थ, लो फॅट नमकीन असे अनेक पदार्थ खातात, परंतु असे खाल्ल्यामुळे पोट भरलं तरी आहारातून पोषण कमी जातं.

चणे, दाणे- भाजलेले शेंगदाणे आणि चणे हे अतिशय आरोग्यदायी, पौष्टिक आणि चविष्ट असतात. यात उपयुक्त प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ असतात. भाजलेले असल्यामुळे कुरकुरीत खाल्ल्याचा आनंद मिळतो.

फळं – मधल्या वेळेत फळं खाल्ल्याने समाधान मिळते आणि आरोग्यालाही उपयुक्त असतात. फळांमधून उपयुक्त कर्बोदके, तंतुमय पदार्थ आणि उपयुक्त जीवनसत्त्व आणि खनिजे मिळतात. रंगीबेरंगी फळांचा समावेश आरोग्यासाठी गुणकारी असतो.

सुका मेवा – काजू, बदाम, अक्रोड, किसमिस, मनुका, खजूर, अंजीर, पिस्ता असे विविध जिन्नस सुक्या मेव्यात असतात. हा सुका मेवा आरोग्यदायी, पौष्टिक असतो आणि योग्य प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा शरीराला पुरवठा होतो.

घरी बनवलेला कुरमुरे किंवा पोह्याचा चिवडा – पोह्यांचा किंवा कुरमुऱयाचा चिवडा खायला चविष्ट आणि कुरकुरीत असतो. त्यात चणे, दाणे, काजू, किसमिस, मिरची, कडीपत्ता यांचा समावेश करावा.

चहाबरोबर पोळी, घरगुती खाकरा यांचा समावेश बिस्कीट किंवा टोस्टपेक्षा चांगला. असे पौष्टिक आणि ऊर्जादायी पदार्थांचा समावेश मधल्या वेळेस करावा आणि त्यातील पोषक घटकांचा आनंद घ्यावा.