आटपाडी तालुक्यात अतिवृष्टी; मिटकी येथील तलाव फुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यात रविवारी रात्री परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. खरसुंडी गावात दोन तासांत तब्बल 126 मि. मी. पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे मिटकी येथील साठवण तलाव फुटला असून, 12 ते 15 पूल पाण्याखाली गेले आहेत. शिवाय, फळबागांसह खरिपाच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, यावर्षी सरासरीच्या तिप्पट पाऊस झाल्याने दुष्काळी आटपाडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.

आटपाडी तालुक्यातील खरसुंडी, नेलकरंजी, हिवतड, गोमेवाडी, बनपुरी, करगणी, शेटफळे या भागांत रविवारी अतिवृष्टी झाली. घाटमाथ्याच्या खाली पाऊस झाल्यामुळे करगणी, शेटफळेचा बेलवण आणि आटपाडीतील शूक ओढय़ाचे पाणी पात्राबाहेर गेले. पावसामुळे राज्य महामार्गावरील दिघंची-हेरवाडवरील शेटफळे येथील पुलासह माळेवाडी, शेटफळे-करगणी, शेटफळे- रेबाई, नेलकरंजी गावाला जोडणारा मुख्य एक आणि आणि वाडी-वस्तीवर जाणारे दोन, तळेवाडी करगणी रस्त्यावरील एक असे आठ पूल खचले आहेत.

20 वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून बांधलेला मिटकी येथील ओलेकर साठवण तलावाचे नुकतेच गाळ भरण्याचे काम केले होते. हा तलाव सांडव्याच्या ठिकाणी फुटला असून, मोठे नुकसान झाले आहे. आटपाडीच्या फरशी पुलावरून पाणी गेले. त्यामुळे ओढय़ालगत असलेल्या पाच टपऱया या पाण्यासोबत वाहून गेल्या.

40 वर्षांतील विक्रमी पाऊस

दुष्काळी आटपाडी तालुक्यात पावसाची सरासरी 250 ते 300 मिलिमीटर असते. यावर्षी पावसाने कहर केला असून, तब्बल विक्रमी 900 मिलिमीटरचा टप्पा जवळ केला आहे. डी तालुक्यात खरसुंडीत 889, आटपाडी 878 आणि दिघंची 750 मिलिमीटर पाऊस पडला आहे. तालुक्यात सरासरी 840 मिमी पावसाची नोंद झाली असून, 40 वर्षांतील हा विक्रमी पाऊस आहे.