‘रिपब्लिक’वरील जाहिराती हटवल्या, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआरपी घोटाळ्यात नाव आलेल्या चॅनेल्सला आता जाहिरात कंपन्यांनी दणका द्यायला सुरुवात केली आहे. नुकतेच बजाज ऑटोने ’रिपब्लिक’सह काही चॅनेल्सवरच्या आपल्या जाहिराती बंद केल्या होत्या. त्यानंतर आता पारले-जी आणि अमूल कंपन्यांनीही या वादग्रस्त चॅनेल्सवर जाहिराती बंद करायचे ठरवले आहे. या निर्णयाबद्दल सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या तीन वाहिन्यांचा टीआरपी घोटाळा उघड केल्यानंतर मोठमोठय़ा कंपन्या सावध झाल्या आहेत. त्यांनी या चॅनेल्सवरील जाहिराती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. समाजात द्वेष पसरवणाऱया कंटेंटचा निषेध केला आहे. यासंदर्भात पारले जी प्रोडक्टचे मार्केटींग हेड कृष्णराव बुद्ध म्हणाले, सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱया आणि समाजात तेढ निर्माण करणारा कटेंट प्रसारित करणाऱया वृत्तवाहिन्यांवर आमच्या कंपनीकडून जाहिरात प्रसारित करण्यात येणार नाही. आमच्या या निर्णयाचे स्वागत करून इतरही कंपन्यांनीही याचे अनुकरण करावे. या निर्णयामुळे टिव्ही चॅनेल्स त्यांच्या कंटेंटमध्ये बदल करतील, अशी अपेक्षाही कृष्णराव बुद्ध यांनी व्यक्त केली आहे.

अमूल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांनीही वादग्रस्त चॅनेल्सवरील जाहिरातींबाबत पुनर्विचार करण्यास कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांना सांगितले आहे. वृत्तवाहिन्या या जाहिरातींसाठी महत्त्वाचे माध्यम आहेत. मात्र जर वाहिन्या विषारी मजकूर प्रसारित होत असेल तर अमूल कंपनी अशा वर्तणुकीविरोधात वाहिन्यांवर दबाव आणू शकते, असे म्हणत सोधी यांनी जाहिराती हटवण्याचे संकेत दिले.