टीआरपी घोटाळा- पाचव्या आरोपीला उत्तर प्रदेशातून उचलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआरपी घोटाळ्यात पाचव्या आरोपीला मुंबई क्राईम ब्रँचने उत्तर प्रदेश येथून अटक केली. विनय त्रिपाठी असे त्याचे नाव असून तो हंसा कंपनीचा माजी कर्मचारी आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले जाणार आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस आता फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक करणार आहेत.

पोलीस उपनिरीक्षक संतोष कोतवाल, प्रकाश होवाळ, नितीन लोंढे, सुभाष मुठे आदी अधिकाऱयाचे पथक उत्तर प्रदेशच्या मिरझापूर येथे गेले. आज सायंकाळी पोलिसांनी विनयला मिरझापूर येथून ताब्यात घेऊन अटक केली. विनय हा हंसाचा माजी कर्मचारी असून त्याने दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडली होती. तो अटकेत असलेल्या विशाल भंडारीला पैसे देत असायचा अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले जाणार असल्याचे गुप्तवार्ता विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काझे यांनी सांगितले.

टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी आज हंसा कंपनीचे सीईओ प्रवीण निझार आणि हंसाचे डेप्युटी मॅनेजर नितीन देवकर यांचा देखील जबाब नोंदवला. रात्री उशिरा पर्यंत जबाब नोंदवण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या दोन वरिष्ठाना आज कागदपत्रे घेऊन बोलवले होते.

फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक
टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलीस आता फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक करणार आहेत. फॉरेन्सिक ऑडिटर हे या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना मदत करणार आहेत. चॅनल्सच्या बँक खात्याच्या तपशीलाबाबत ते तपासणी करून त्यानंतर त्याचा अहवाल पोलिसांना सादर करतील.

दोन चॅनल्सची बँक खाती गोठवली
मुंबई पोलिसांनी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन चॅनल्सची बँक खाती गोठवली आहेत. त्या दोन चॅनल्सच्या चार बँक खात्यात कोटय़वधी रुपये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांच्या रडारवर आणखी काही चॅनल्स आहेत.