
कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या अंदाजपत्रकीय सभेस अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या सोमवारी (दि. 19) ही सभा ऑनलाइन पद्धतीने होत आहे.
अंदाजपत्रकीय सभा होत नसल्याने नगरसेवक निधी व इतर निधीमधील कामे रखडली होती. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी होती. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी यासाठी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाकडून या सभेचा प्रस्ताव नगरसचिव विभागाकडे पाठविण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महासभेचा अजेंडा काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार येत्या सोमवारी ही सभा होत आहे.
तिजोरीत खडखडाट
कोरोनामुळे मालमत्ता कराची वसुली झालेली नाही. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात घट झालेली आहे. मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. मालमत्ता कराची आतापर्यंत केवळ 13 कोटींची वसुली झालेली आहे. त्यामुळे अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार किती टक्के खर्चाला मान्यता मिळते, यावरच प्रभागातील विकासकामे अवलंबून असणार आहेत.




























































