
नगर जिह्यातील कर्जत, पारनेर आणि अकोले या तीन नगरपंचायतींचा निवडणुकांसाठीचा प्रभागरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला आहे. यातून आता जिह्यात राजकीय खलबतेंना जोर येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे. त्यानुसार कर्जत, पारनेर आणि अकोले या नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत प्रभागरचनेचे प्रस्ताव सादर करणे, 29 ऑक्टोबरपर्यंत प्रारूप प्रभागरचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे, 3 नोव्हेंबरला सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीसाठी नोटीस प्रसिद्ध होणार, 10 नोव्हेंबरला नगरपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. 18 ते 26 नोव्हेंबरपर्यंत प्रारूप प्रभागरचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्यपदांच्या आरक्षणवर हरकती मागविण्यात आल्या आहेत. 10 डिसेंबरला हरकतींवर सुनावणी होणार आहे. 17 डिसेंबरला अंतिम प्रभागरचना मंजूर करण्यात येणार आहे. 24 डिसेंबरपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.




























































