विनय त्रिपाठीला चार दिवसांची पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआरपी घोटाळ्यात उत्तर प्रदेशहून अटक केलेल्या विनय त्रिपाठीला आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर विनयच्या फोनचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रँचचे पथक परराज्यात गेले आहे.

टीआरपी घोटाळ्यात क्राईम ब्रँचचे एक पथक उत्तर प्रदेशला गेले होते. तेथून त्याला अटक करत बुधवारी मुंबईत आणले. आज सकाळी विनयला न्यायालयात हजर केले. विनयने किती घरात बेरोमीटर लावले होते याची माहिती पोलिसांना हवी आहे. त्याने टीआरपी वाढवण्यासाठी कोणत्या चॅनल्सकडून किती पैसे घेतले होते याचा तपास केला जाणार आहे. तसेच त्याच्या बँक खात्याची तपासणी केली जाणार आहे. विनयचा फोन पोलिसांसाठी महत्वाचा पुरावा आहे. त्या फोनच्या माध्यमातून अनेक बाबीचा खुलासा होणार आहे. विनयने फोन एका जणाला दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्या फोनचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रँचचे एक पथक परराज्यात गेले आहे.

हंसाच्या तीन वरिष्ठांचा जबाब नोंदवला
क्राईम ब्रँचने आज हंसा कंपनीच्या तीन वरिष्ठांचा जबाब नोंदवला. त्या तिघांची सहा तास पोलिसांनी चौकशी केली. हंसा कंपनी आणि काही जाहिरात कंपनीने पोलिसांना आज काही कागदपत्रे सादर केली. ती तपासण्याचे काम पोलीस करत आहेत.