भागीदारीतील व्यवहारात साडूने फसविले; कॉन्ट्रॅक्टरची गळफास घेत आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भागीदारीत असलेल्या व्यवहारात साडूने फसवल्याच्या तणावातून कॉन्ट्रॅक्टरने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये साडूनेच कामाचा हिशेब न देता 14 लाखांची फसवणूक केल्याच्या तणावातून कॉन्ट्रॅक्टरने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील मिरेकरवस्तीवर घडली आहे.

शंकर हुगार (वय 45, रा. हडपसर) असे आत्महत्या केलेल्या कॉन्ट्रॅक्टरचे नाव आहे. याप्रकरणी साडू शांतप्पा फुगार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी हुगार (वय 40, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर आणि शांतप्पा साडू असून त्यांनी भागीदारीत महानगरपालिकेच्या ड्रेनज पाईपलाईनचे काम घेतले होते. त्यामध्ये जो नफा होईल तो दोघांमध्ये वाटून घेण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, शांतप्पाने ड्रेनज पाईपलाईन कॉन्ट्रॅक्टमध्ये झालेला नफा शंकरला दाखविला नाही. त्यामुळे शंकरने त्याला हिशेब मागितला असता, शांतप्पाने शिवीगाळ करुन मारहाण केली. कामाचे 14 लाख रुपये न दिल्याच्या तणावातून शंकरने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

शंकर आणि शांतप्पा एकमेकांचे नातलग असून त्यांनी महानगरपालिकेच्या ड्रेनजचे काम हाती घेतले होते. मात्र, त्यातील 14 लाखांचा हिशेब न दिल्याच्या तणावातून शंकरने आत्महत्या केली. याप्रकरणी शांतप्पाचा शोध घेतला जात आहे.
-रत्नदीप गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक, हडपसर