माहीम चौपाटी चाफा, टेकोमा, बांबू, सुरूच्या वनांनी बहरणार! आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लागवडीचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत झाडांची संख्या वाढवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेणाऱ्या पालिकेने माहीम चौपाटीवर चाफा, टेकोमा, बांबू आणि सुरूच्या वनांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरवणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुरूची 250 झाडांची लागवड करण्यात आली.

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून चौपाटय़ांच्या नैसर्गिक ढाच्याला कोणताही धक्का न लावता चौपाटय़ांचा विकास करण्यात येत आहे. यामुळे पर्यटकांचे आकर्षण वाढवणे, सुविधा आणि मनोरंजन उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत माहीम चौपाटीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. यावेळी स्थानिक नगरसेवक मिलिंद वैद्य यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पिवळा टेकोमा, बांबू-सुरूची वने आकर्षण

टेकोमा या वनस्पती पिवळ्या आकर्षक फुलांनी बहरणार आहे. तर बांबू आणि सुरूची वनांमुळे निर्माण होणारी हिरवाई पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. यामध्ये 200 चाफ्याची झाडे, 350 बांबू आणि 350 टेकोमाची झाडे लावण्यात येणार आहे. मुंबईत पहिल्यांदाच चौपाटीवर नैसर्गिक सौंदर्य वाढवणाऱया झाडांची लागवड पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.