करवीर नगरीत यंदाचा दसरा राजेशाही थाटाविना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक जत्रा, यात्रा, सण-उत्सव रद्द करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवही भाविकांविना साध्या पद्धतीने साजरा होत आहे. आता म्हैसूर पाठोपाठ प्रसिद्ध व करवीर संस्थांनपासून सुरू असलेला दसऱ्याचा शाही सीमोल्लंघनाचा सोहळाही यंदा प्रथमच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवरात्रोत्सवात विजयादशमीला संपूर्ण देशात म्हैसूर पाठोपाठ करवीर संस्थान या दोन राजघराण्यातर्फे शाही सिमोल्लंघन करण्याची परंपरा आजही कायम आहे. संस्थांन काळापासून येथे सुरू असलेल्या या शाही दसरा महोत्सवाचे नियोजन छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट कडून करण्यात येते. राजघराण्यातील शाही परंपरेनुसार विजया दशमी दिवशी सायंकाळी सूर्यास्तावेळी राजपरिवारातील सर्व सदस्य शाही गणवेशात पारंपरिक मेबॅक गाडीतून लवाजम्यासह ऐतिहासिक दसरा चौकात येतात. श्रीअंबाबाई,‌ श्रीतुळजाभवानी तसेच गुरुमहाराज यांच्या पालख्याही लवाजम्यासह दाखल होतात.

तोफेची सलामी, पोलीस व सैन्य दलाचे वाद्यवृंद, हलगी कैचाळाच्या ठेक्यात तलवार, दांडपट्टयांची प्रात्यक्षिकातून राजपरिवाराचे होणारे स्वागत तसेच संस्थान काळातील सरदार, मानकऱ्यांचे वारसदार, पोलीस, सनदी व सैन्य दलाचे अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शाही परिवाराकडून लकडबंदचे पुजन होतं. त्यानंतर सोनं (प्रतिकात्मक आपट्याची पाने) लुटण्यासाठी मैदाना सभोवती जमलेल्या कोल्हापूरकरांची झुंबड उडते. त्यातून जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार करत शाही लवाजम्याचे ऐतिहासिक भवानी मंदिरासह करवीर निवासिनीच्या दर्शनासाठी प्रस्थान होते. देवतांच्या पालख्या सर्व वसाहतींतून जाण्याची छत्रपती शाहु महाराजांची सामाजिक ऐक्याची परंपरा आजही कायम आहे. कितीही पाऊस असो आजपर्यंत या परंपरेत कधी खंड पडला नाही. पण यंदा प्रथमच कोरोना संसर्गामुळे गर्दी टाळण्यासाठी हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि छत्रपती परिवाराकडून घेण्यात आला आहे.

कोरोनाला हद्दपार करुया – श्रीमंत शाहू छत्रपती
संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आहे. आपले सणवार, उत्सव, रितीरिवाज, परंपरा अशा संकटावेळी पाळल्या नाहीत तर काही बिघडणार नाही. आमच्या उत्सवांपेक्षा नागरीकांचे आरोग्य आमच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. एक वर्ष दसऱ्यातील समोल्लंघन केले नाही तर चालेल, पण कोरोनाला हद्दपार करण्यास आपण सज्ज होऊ या असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले आहे.