कृषी कायद्यांविरोधात चार विधेयके; पंजाब विधानसभेचा केंद्राला ‘दे दणका’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील मोदी सरकारला मंगळवारी पंजाब विधानसभेने मोठा दणका दिला. देशभरातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या नव्या कृषी कायद्यांविरोधात ठराव तसेच चार विधेयके सर्वानुमते मंजूर करण्यात आली. विशेष अधिवेशनात विधेयकांवर जवळपास पाच तास चर्चा झाली. चर्चेत भाजपच्या दोन आमदारांनी भाग घेतला नाही. मात्र विरोधी बाकावरील इतर पक्षांच्या आमदारांनी एकमुखी पाठिंबा दिला.

विधानसभेत मंजूर केलेल्या विधेयकांतील तरतुदींनुसार, पंजाबमध्ये कुठेही किमान हमीभावापेक्षा कमी दराने गहू आणि धानची खरेदी केली जाऊ शकणार नाही. जर कोणत्याही कंपनी वा कॉर्पोरेट व्यापाऱ्याने अशा प्रकारे खरेदी केली तर संबंधितांना तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकणार आहे.

पंजाब विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राज्यात केंद्राच्या कृषी कायद्यांची अंमलबजावणी न करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्यपाल वी. पी. सिंह बदनोर यांची भेट घेऊन ठरावाच्या प्रति सोपवल्या. राज्यपाल आमच्या म्हणण्याचा स्वीकार करतील, अशी आशा आम्ही बाळगतो. तसेच आम्ही राष्ट्रपतींकडे 2 ते 5 नोव्हेंबरदरम्यानची वेळ मागितली असल्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सांगितले.