
मुंबईची लोकल महिलांसाठी खुली झाली आहे. योग्य ती काळजी घेत आपले राज्य शासन मुंबईचे जीवनचक्र रुळावर आणत आहे. पाहूया महिला प्रवाशांच्या प्रतिक्रिया
अत्यावश्यक सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या लोकलमध्ये आता सर्वसामान्य महिलांनाही प्रवास करता येणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे महिलांनी स्वागत केले आहे, मात्र घालून दिलेली वेळेची मर्यादा महिलांनी बदलण्याबाबत काही सूचना केल्या आहेत. त्याबाबत आपण जाणून घेऊया.
नियम पाळणे आपले कर्तव्य
काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे रेल्वे सेवा सुरू झालीय त्याचे स्वागतच आहे. आनंद आणि उत्साह आहे. कारण प्रवासाचे तास वाचणार आहेत. रेल्वे सेवा सुरू नव्हती त्यामुळे प्रवासाच्या अनेक अडचणी येत होत्या. पण आता रेल्वे सेवा महिलांसाठी सुरू केलीय ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. रेल्वे प्रवासात कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा जास्त धोका असला तरी रेल्वे सेवाच सोयिस्कर असल्याचे मला वाटते. सरकारचे आणि रेल्वेचे सगळे नियम पाळणे हे आता आमचं कर्तव्यच बनलं आहे. आता मास्क लावणे, एकमेकांमध्ये शक्य होईल तितके अंतर ठेवणे, सतत हात धुणे, हातांना सॅनिटायजर लावणे हे सावधगिरीचे उपाय आम्ही करतच राहू. यामुळे रेल्वेत महिलांची गर्दी वाढली तरी कोरोनाला दूर ठेवता येईल असं मला वाटतं. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होतोय. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने महिलांना ठरावीक वेळेत प्रवासाची मुभा दिलेली आहे. रेल्वे सेवा सुरू केल्यामुळे रेल्वे प्रशासनाचे आभारच मानते. पण ठरवून दिलेली वेळ जर सकाळी केली तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल.
– तृप्ती साटम, आयडीबीआय बँक कर्मचारी, बदलापूर
निर्णयाचे स्वागतच करूया
रेल्वे सुरू झाल्यामुळे आनंदच आहे. मुंबईची लाइफलाइन अखेर महिलांसाठी सुरू झाली आहे. ट्रेन प्रवास बंद असल्यामुळे प्रवास फार त्रासदायक होत होता. बरं कुठे जायचे असल्यास खासगी वाहनं परवडत नाहीत, अशा वेळी तासन् तास बससाठी उभं राहिल्यावर घरी येईपर्यंत पुरते थकायला होत होते. त्यानंतर घरची कामं करणं फार त्रासदायक होतंय ही माझ्यासारख्या गृहिणीची अवस्था आहे, मग नोकरी करणाऱया महिलांना हा प्रवास किती त्रासदायक होत असेल याचा अंदाज सगळ्यांनाच असेल. गरज असेल तरच मी घराबाहेर पडते. खरं तर कोरोनाने आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी हे शिकवलेलेच आहे. त्यामुळे प्रत्येक जण त्याबाबत जागरूक आहे. आज प्रत्येक जण आपली काळजी घेतेय. ट्रेनमध्ये हा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यात पहिल्याच दिवशी ट्रेनमध्ये गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे तिथे सोशल डिस्टंसिग पाळणं खरंच कठीण होणार आहे. अशा वेळी आपली काळजी आपण घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी गृहिणी असल्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडते. प्रवास करताना तोंडाला मास्क लावणे, अंतर ठेवणे, सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे. ऑफिसमध्ये गेल्यावर हात, तोंड स्वच्छ धुणे, घरी आल्यावर इथे-तिथे स्पर्श न करता थेट आंघोळीला जाणे. कपडे गरम पाण्यात भिजत घालणे आणि नंतर वाफ घेणं या गोष्टींची काळजी घेणार. महिलांसाठी रेल्वे सेवा सुरू झाली असली तरी सकाळी अकरानंतर कामावर जाणाऱयांची संख्या फार कमी आहे. पण सध्या तरी महिला विशेष गाडय़ा सुरू केल्या आहेत त्याचे स्वागतच करूया.
– ज्योती मांजरेकर, गृहिणी





























































