राधा नगरी इकोसेन्सिटिव्ह, कोल्हापूर जिल्ह्यातील 26, सिंधुदुर्गामधील 15 गावांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत विस्तारीत क्षेत्र करून कोल्हापूर जिल्ह्यातील 26 गावांचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 15 गावांना पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध केली असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली.

राज्य शासनाने 16 सप्टेंबर 1985 रोजी अधिसूचना काढून 351.16 चौ.किलोमीटर क्षेत्रावर राधानगरी वन्यजीव अभयारण्य जाहीर केले. 1986 ला पर्यावरण कायदा झाला. त्यानुसार अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने यांच्या बाहेरच्या सीमेपासून 10 किलो मीटरपर्यंत संवेदनक्षेत्र राहील अशी तरतूद करण्यात आली. राज्य शासन, केंद्र शासन यांच्या मार्फत वेळोवेळी मार्गदर्शक सूचनांच्या आधारे उप वनसंरक्षक कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील 26 गावे 15 हजार 39 हेक्टर क्षेत्र व सिंधुदुर्गमधील 15 गावे 10 हजार 26 हेक्टर क्षेत्र असे एकूण 250.66 चौरस किलोमीटर क्षेत्रावर इको सेन्सेटीव्ह झोन प्रस्तावित करून 9 ऑक्टोबर 2019ला केंद्र सरकारला पाठविण्यात आला होता. त्यावर केंद्राच्या 15 ऑक्टोबर 2020 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. राधानगरी अभयारण्याच्या सीमेच्या चारही बाजूने 200 मीटर ते 6.01 कि.मी. पर्यंत क्षेत्र निश्चित केले.