परदेशी विद्यार्थी, व्यावसायिकांना हिंदुस्थानात येण्याची मुभा, पर्यटकांसाठी दरवाजे बंदच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व्हिसावर घालण्यात आलेले निर्बंध केंद्र सरकारने शिथिल केले. परदेशी विद्यार्थी, व्यावसायिकांना आता हिंदुस्थानात येण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र पर्यटकांसाठी देशाचे दरवाजे बंदच ठेवण्यात आले आहेत.

केंद्रीय गृहखात्याने कोरोनामुळे व्हिसावर टाकण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेतला. इलेक्ट्रॉनिक, पर्यटक आणि आरोग्य व्हिसावरील बंदी कायम ठेवून इतर क्षेत्रातील व्हिसा मोकळे करण्यात आल्याचे गृहखात्याने जाहीर केले. त्यामुळे परदेशी विद्यार्थी, व्यावसायिकांना हिंदुस्थानात येण्याची मुभा मिळाली आहे.

हिंदुस्थानात येणारे परदेशी नागरिक, परदेशात राहणारे हिंदुस्थानी यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. वर्जित व्हिसा वगळता परवानगी देण्यात आलेल्या व्हिसाची मुदत संपली असेल तर नवीन व्हिसा देण्यात येणार असल्याचेही गृहखात्याने स्पष्ट केले आहे.

आरोग्य सुविधेसाठी हिंदुस्थानात येणाऱया परदेशी नागरिकांना आता नव्याने अर्ज करावा लागणार आहे. तर ओसीआय व पीआयओ कार्ड धारकांना हवाई तसेच जलमार्गाचा प्रवास वैध करण्यात आला आहे.

व्यावसायिकांनाही देशात कुठेही जाता येणार आहे. रोजगार, संशोधन करणाऱया विद्यार्थ्यांनाही विनासायास हिंदुस्थानात येता येणार आहे. ‘वंदे भारत’ वा इतर कोणत्याही विमान सेवेचा त्यांना लाभ घेता येणार आहे.