
आजपासून 10 वर्षाखालील व 65 वर्षावरील व्यक्ती व गर्भवती महिलांसाठीही ताडोबा खुले असणार आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना जिल्ह्यातच अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणास्तव बाहेर पडण्यास प्रतिबंध होता. तो आता उठवण्यात आल्याने ताडोबानेही ही बंदी उठवली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन 1 ऑक्टोंबरपासून नियमितपणे सुरु झाले आहे. मात्र, कोवीडबाबतच्या दक्षतेमुळे अद्याप 10 वर्षाखालील व 65 वर्षावरील व्यक्तींना तसेच गर्भवती महिलांना पर्यटनासाठी प्रवेश दिला जात नव्हता. आता तो आदेश मागे घेण्यात आला असून, 10 वर्षाखालील व 65 वर्षावरील व्यक्तींना व गर्भवती महिलांनासुध्दा ताडोबा पर्यटनासाठी परवानगी देण्यात येत असल्याची बाब पर्यटनाच्या संकेतस्थळावर आज रात्री 12 वाजेनंतर स्पष्ट केली जाणार आहे.
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्याशी चर्चा करून त्यांची रितसर परवानगी घेतल्याची माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. मात्र, जे आजारी असतील किंवा ज्यांना कोवीडची लक्षणे असतील, त्यांना मात्र ताडोबा पर्यटनासाठी परवानगी नसेल, हेही त्यांनी स्पष्ट केले.
ताडोबा येथील पर्यटन राज्य सरकार व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांचे दिशानिर्देशानुसार होत असून, एका खुल्या जिप्सी वाहनात 1 वाहनचालक, 1 मार्गदर्शक व 4 पर्यटक एवढ्याच व्यक्तींना प्रवेश दिला जात आहे. 10 वर्षाखालील व 65 वर्षावरील व्यक्तींना तसेच गर्भवती स्त्रियांना पर्यटनासाठी प्रवेश दिला जात नव्हता. आता तो दिला जाणार आहे. प्रवेशद्वारावर शारीरिक अंतर पाळणे आवश्यक राहीलच. प्रवेश देण्यापूर्वी सर्व पर्यटक, जिप्सी चालक, मार्गदर्शक यांच्या शरिराचे तापमान तपासले जाईल. ते सर्वसाधारण असल्यास प्रवेश देण्यात येणार आहे. ताप-सर्दी-खोकला असलेल्या, आजारी असलेल्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती नजीकच्या कोविड रुग्णालयात दिली जाणार असल्याचे डॉ. रामगावकर म्हणाले.



























































