
एकल पालकत्व (सिंगल मेल पॅरेंट) स्वीकारलेल्या पुरुषांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचारी जे एकट्याने मुलांचे संगोपन करतात, अशा पित्यांना आता विशेष सुट्टी म्हणजेच ’चाईल्ड केअर लिव्ह’ मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी चाईल्ड केयर लिव्ह संदर्भातील घोषणा केली. एकल पालकत्व स्वीकारलेले पुरुष कर्मचारी म्हणजे विधुर, घटस्फोटीत किंवा अविवाहित कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. पुरुष कर्मचाऱ्यांच्या ’चाईल्ड केयर लिव्ह’ संदर्भातील आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव सार्वजनिकदृष्टय़ा हा निर्णय सर्वांपर्यंत पोहोचला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पहिल्या वर्षी संपूर्ण चाईल्ड केअर लिव्ह ही भरपगारी रजा म्हणूनही वापरता येईल. तसेच दुसऱ्या वर्षी भरपगारी रजेच्या 85 टक्के चाईल्ड केअर लिव्हच्या स्वरूपात वापरता येईल. याव्यतिरिक्त दिव्यांग बालकांच्या देखभालीसाठीही नियम तयार करण्यात आले आहेत. यासाठी बालकाच्या वयाची अट ठेवण्यात आली असून कमाल वय 22 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.


























































