सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले दुर्मिळ सोनेरी बेडूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अनेक तीव्र उतार व उच्च प्रवाह असलेले अनेक लहान मोठे पाण्याचे धबधबे आहेत. नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अतिशय दुर्गम भागातील एका धबधब्यावर एक दुर्मिळ सोनेरी बेडूक आढळून आले आहे. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व हेमंत केंजळे यांना या बेडकाचे अस्तित्व आढळून आले आहे. सदर बेडूक प्रजाती ही दुर्मिळ असून आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात दोनदा नोंद झालेली आहे.

ऑगस्ट 2012 साली हिंदुस्थानातील लुप्त झालेले उभयचर प्राणी यांच्यावर मोठे कार्य महाराष्ट्र शासन वनविभाग, आय.यु.सी.एन , सांचुरी ऐशीया व हिंदुस्थानातील लुप्त झालेले उभयचर अश्या संघटनेने संयुक्तपणे कोयनानगर येथून सुरु केले. 2014 साली डॉ बिजू दास , दिल्ली युनिव्हर्सिटी व त्यांचे सहकारी यांना हिंदुस्थानातील सात नवीन लुप्त उभयचर बेडूक प्रजाती शोध लावले होते. त्यामध्ये हा बेडूक प्रथम सिंधुदुर्ग येथे सापडला होता.

उभयचर प्राणी म्हणजे भूमी आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहू शकणारा प्राणी. २०१२ साला पासून सुरु झालेल्या कार्यात एका म्हत्वाचे घटक हे डॉ.सीझर सेनगुप्ता होते.
ते एक अत्यंत प्रसिध्द रोगनिदान तज्ञ (पेथोलोजिस्ट) व थायरॉकेर लॅबचे उपाध्यक्ष आहेत. तर ते एक आघाडीचे वन्यजीव छायाचित्रकार आहेत. २०१४ मध्ये सिंधुदुर्ग येथे नव्याने सापडलेल्या बेडूक प्रजातीस शास्त्रीय नाव : इंडोसिल्व्हिराना सीझरी दिले आहे तर याला बोली भाषेत महाराष्ट्र सोनेरी पाठीचा बेडूक असे नाव दिले गेले. या जाती विषयी, त्याच्या प्रजनन व इतर शास्त्रीय माहितीवर फारसा आभ्यास झालेला नाही व अत्यल्प प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. हा बेडूक प्रदेशनिष्ठ आहे. म्हणजेच जगात फक्त ही प्रजाती याच भागात (पश्चिम घाटात) आढळते. यापूर्वी यांची नोंद सिंधुदुर्ग व आंबोली येथे झाली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील उच्च व तीव्र उतार तसेच,खडकाळ प्रवाह असलेल्या काही दुर्गम भागातील धबधब्यावर यांचे अस्तित्व आहे. सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातून वारणा, कोयना या नद्या प्रवाहित होतात. वारणा नदीचा उगम तर चांदोली राष्ट्रीय उद्यानातूनच होतो. या दोन्ही नद्यांवर चांदोली व कोयना धरण बांधण्यात आले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ही बेडूक प्रजाती प्रथमच नोंद झाली आहे. ही नोंद सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अभिमानाची बाब आहे.

सह्याद्री व्यघ्र प्रकल्पाचा दहा वर्षीय आराखडा अद्यावत होणार आहे. त्यासाठी वन्यजीव विभागाने कोयना व चांदोली क्षेत्रातील प्रदेशनिष्ठ वनस्पती , वन्यजीव, तसेच इतर जैवविविधता आढावा व शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. पुढील दहा वर्षीय सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आराखडा परिपूर्ण असावा यासाठी क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते , सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल गोविंद लेंगुटे, ह्यांनी पुढाकार घेऊन हे काम सुरू केले आहे . सर्वांच्या मार्गदर्शनखाली नुकत्याच झालेल्या पहिल्या पाहणी दौऱ्यात मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व हेमंत केंजळे यांना या दुर्मिळ प्रजातीचे दर्शन झाले.
सहयाद्री हे जगातील जैवविविधतेने समृद्ध असे महत्वाचे स्थान ठरले आहे. लवकरच लुप्त होण्याच्या धोका असलेल्या व केवळ याच भागात आढळणाऱ्या वनस्पती, प्राणी, पक्षी, व इतर प्रजाती यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. या प्रदेशात अनेक मोठे जलसाठे , नद्यांचे उगम तर आहेतच, शिवाय येथील संरक्षित अमुल्य , अद्वितीय पर्यावरण प्रणाली महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा पाया आहे. शुध्द हवा व शुध्द पाणी साठीचे हे सह्याद्री फुफुस आहेत, तर या जंगलांमुळेच आपली पाण्याची स्तोत्र शाबूत राहतील. या जंगल परिसराचे महत्व अधोरीखीत होते. माणसाचे जीवन निसर्गावरच अवलंबून आहे आपण सर्वांनी यांचे संवर्धन करायला पाहिजे .

रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक