
>> शिबानी जोशी
आज रात्री लक्ष्मी आई प्रत्येकाला हा प्रश्न विचारेल… आजच्या परिस्थितीत आपल्यापैकी हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवा. स्वच्छतेच्या, आरोग्याच्या दृष्टीने, कोरोनाची त्रिसूत्री पाळण्याच्या दृष्टीने आपण खऱया अर्थाने जागरूक आहोत का?
कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव. त्यामुळे या चंद्राच्या शीतल चांदण्यात जागरण करायचं अशी आपल्या संस्पृतीतील पद्धत आहे.
परंतु सध्या करोनाच्या संकटामुळे गेले सात-आठ महिने आपण कोणताही सण एकत्र येऊन साजरा करू शकलो नाही आहोत. गणपती, नवरात्र, श्रावण महिन्यातले सर्व पारंपरिक सण आपण घरातल्या घरातच साजरे केले. मंदिरही बंद असल्यामुळे आपण मंदिरातही असे सार्वजनिक कार्यक्रम करू शकत नाही आहोत. त्यामुळे यंदाची कोजागिरी पौर्णिमा ही घरीच बसून साजरी करावी लागणार आहे. अनेक सामाजिक संस्था, सांस्पृतिक मंडळ, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासाठी हा दिवस एकत्र येण्याचा, आनंदाचा असतो, परंतु यंदा हा दिवस ऑनलाइन पद्धतीने अनेक मंडळी साजरी करणार आहेत. गाण्यांचेही अनेक कार्यक्रम होत आहेत, परंतु तेही ‘फेसबुक’च्या माध्यमातून होणार आहेत. माझ्या ओळखीतल्या काही संस्थांनी कार्यक्रम करता येईल का? याचा प्रयत्न करून पाहिला. छोटय़ाशा बागेमध्ये मोजक्या सभासदांना बोलून कार्यक्रम होऊ शकतो का याची चाचपणी केली, परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आपण कार्यक्रम करायचा नाही असा निर्णय त्यांनी घेतला. यातूनच मुंबईकर आता सुजाण झाले आहेत याची प्रचीती येते.
एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी अनेक पर्यटन कंपन्या या दिवशी सहल आयोजित करत असतात आणि त्याला भरभरून प्रतिसादही मिळत असतो. काही पर्यटन कंपन्यांनी तसा प्रयत्न करून पाहिला, परंतु रसिक पर्यटकांचा त्याला प्रतिसादही अल्प लाभल्यामुळे काही जणांनी ती योजनाही रद्द केली असे दिसून आले. अनेक मंडळांचे सभासद त्यांच्या त्यांच्या यूटय़ूब चॅनलवरून गाण्यांचा आस्वाद घेणार आहेत. खरं तर या रात्री दरवर्षी दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी आपल्याला रसिकांनी फुलून गेलेली दिसते. यंदा मात्र चौपाटीवरही त्यामानाने कमी गर्दी दिसेल अशी शक्यता आहे. इतके दिवस आपण संयमाने नियम पाळले, आणखी काही दिवस असेच नियम पाळूया इतकी सजगता काही अपवाद सोडले तर आता समाजामध्ये दिसून येऊ लागली आहे.





























































