लोटस जेटीवरील अतिक्रमणांवर बुलडोझर; कोळी बांधवांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हाजीअली येथील लोटस जेटीवर बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर पालिकेने धडक कारवाई करत बेकायदा बांधकामे हटवली आहेत. शिवाय संबंधित परिसरात स्वच्छता करून सुशोभीकरणही करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक कोळी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून लोटस जेटीवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. यामध्ये किनाऱ्यावर बेकायदेशीपणे बोटी विकण्याचे दुकान थाटण्याचा प्रकारही समोर आला होता. गुजरातूनहून जुन्या बोटी या ठिकाणी विकण्याचा व्यवसाय बेकायदेशीरपणे सुरू होता. शिवाय अतिक्रमणांमुळे स्थानिक कोळी बांधवांची मोठी गैरसोय होत होती. तसेच बेकायदेशीरपणे मासेमारीसाठी बोटी दिल्या गेल्याने स्थानिकांच्या व्यवसायावरही परिणाम होत होता. त्यामुळे पालिकेकडे अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली जात होती.

या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार माजी आमदार सुनील शिंदे, प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी संबंधित प्रशासनाकडे अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला. यानुसार पालिका आणि संबंधित प्रशासनाकडून अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सहायक आयुक्त शरद उघडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे व फिरोज बागवान, लोहार मेरिटाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक सुर्वे यांचे सहकार्य मिळाल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले.