मुंबईत कोरोना हरतोय! रुग्ण दुपटीचा कालावधी दीडशेपार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना आता चांगलेच यश येत असून रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 57 दिवसांनी वाढला असून 157 दिवसांवर पोहोचला आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी आणि प्रभावी उपाययोजनांमुळेच हे यश मिळाले आहे.

मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना ऑगस्टअखेर पुन्हा वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली. मुंबईत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या नियोजनाखाली मुंबईत घरोघरी जाऊन तपासणी, स्क्रिनिंग, सर्वेक्षण आणि मार्गदर्शन करण्यात आले. 15 सप्टेंबरपासून दोन टप्प्यांत राबवण्यात आलेल्या या मोहिमेला आता चांगलेच यश आले आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर दीडशेपार होऊन 157 दिवसांवर गेला आहे.

परळ विभाग सर्वोच्च 362 दिवसांवर
पालिकेचा एफ दक्षिण विभाग म्हणजेच परळ विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वाधिक म्हणजेच 362 दिवसांवर पोहोचला आहे. या पाठोपाठ बी, जी दक्षिण, ए विभागांनीही 200 दिवसांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या बी विभागात 232 दिवस, जी दक्षिण 231 दिवस तर ए विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी 212 दिवस आहे. तर जी-उत्तर, ई, एस आणि एम पूर्व या विभागांत रुग्ण दुपटीचा कालावधी 179 ते 199 दिवसांपर्यंत पोहोचला आहे.

रुग्ण वाढीची सरासरीही घटली
मुंबईत सरासरी रुग्णवाढही झपाटय़ाने कमी होत आहे. यामध्ये गेल्या 10 दिवसांत 0.25 टक्क्यांची घट झाली आहे. 20 ऑक्टोबरला रुग्णवाढीचा सरासरी दर 0.69 टक्के होता तो आता 0.44 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

रुग्ण दुपटीत अशी झाली सुधारणा

  • 100 दिवस – 20 ऑक्टोबर
  • 126 दिवस – 24 ऑक्टोबर
  • 150 दिवस – 29 ऑक्टोबर