
>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])
।। श्री गुरुदेव दत्त ।।
“गरूडेश्वर धन्य धन्य किर्ती गाजली, जेथे श्री वासुदेव मूर्ती राहिली ,
भूवैकुंठची स्थान जगती जाहले, पापात्मे होती शुद्ध महात्मे प्रगटले ,
भाविकांसी दर्शन इथे घडतंसे, भले स्वरगंगा नर्मदे उसळली,
जेथे श्री वासुदेव मूर्ती राहिली “
।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।
श्री दत्तप्रभूंचे उपासक आणि दत्तात्रेयांवर संस्कृत तसेच मराठी मध्ये विपुल लेखन संपदा करणारे आचरणनिष्ठ दंडी संन्यासी प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज शके १८३५ चैत्र वद्य षष्ठी शनिवारी गरूडेश्वर महादेव मंदिराच्या ओटयावर उतरले होते. तेव्हा दाट जंगल होते. नंतर प. प. स्वामी महाराज एकांतात नारदेश्वर महादेव मंदिरात ध्यान जपादी कार्य करण्यास जात असत. स्वामी महाराजांचे वास्तव्य गरूडेश्वरी आहे, असं कळल्यानंतर स्वामी महाराजांचे भक्त मोठ्या प्रमाणात गरूडेश्वरी येऊ लागले. ते वेदांत, धर्माचरण, ज्योतिषविद्या, आयुर्वेद वैगरे विविध विषयांवर प्रवचने करीत. तसेच भक्तांच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन देत असत. सध्या समाधी मंदिराच्या जागी स्वामी महाराजांची पर्णकुटी होती. त्रिविध तापांनी पीडित लोकांना स्वामी महाराज योग्य उपाय सुचवीत असत. बडोद्याच्या विठ्ठल सोनी यांनी श्री दत्तमूर्ती बनवून आणली आणि स्वामी महाराजांना अर्पण केली. श्री दत्ताज्ञेने त्यांची प्रतिष्ठा श्री रामचंद्रशास्त्री प्रकाशकर यांनी चार ब्राह्मणासह आश्विन शु.९ या दिवशी श्री. धोंडोपंत कोपरकरांच्या हस्ते करविली. लहानशा सिंहासनावर विराजमान श्री दत्तप्रभूंच्या मुर्तीची पूजा अर्चना आजही श्री दत्तमंदिरात होते.
श्री स्वामी महाराजांनी लावून सांगितले ह्या देहाचा भरोसा नाही, म्हणून ही मूर्ती वाडी किंवा गाणगापूर येथे जाऊन ठेवून या अथवा एखाद्या योग्य भक्तास दे’ त्याच रात्री श्री दत्तप्रभूंनी गांडाबुवांना स्वप्नांत येऊन सांगितले, येथे आम्हास कायम लीला करावयाचे आहे म्हणून या स्थळी श्रद्धावंत भक्तांच्या मदतीने मंदिर बांधून घे. ह्या स्थानचे महात्म्य वाडी गाणगापूर प्रमाणे हळूहळू वाढेल. म्हणून येथे मूर्ती ठेवून पुजाऱ्याची व्यवस्था कर म्हणून गांडाबुवांनी स्वप्नांनातील गोष्ट सांगण्यासाठी एक विनंती पत्र तयार केले. ते प्रत्येक भक्तास दाखवून कोणाकडून ही पैसे न मागण्याची गोष्ट केली. नंतर श्री दत्तमंदिरांची पायाभरणी श्री स्वामी महाराजांचे प्रियभक्त श्री .छगनलाल कुबेरलाल भट्ट यांच्या हस्ते सवंत १९७० वैशाख शुद्ध सप्तमीच्या दिवशी केली. आज श्री दत्तमंदिरात मध्यभागी श्री दत्तप्रभू तसेच त्यांच्या उजवीकडे पु. आद्य श्री शंकराचार्य तसेच डावीकडे विद्यादायिनी सरस्वती मातेची मूर्ती आहे. ह्या तिन्ही मूर्ती संगमरमरी आहेत. ज्यांची प्रतिष्ठा प. ब्रह्मानंदस्वामींनी केली होती. स्वामी महाराजांनी समाधी घेतलेल्या जागी श्री समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. समाधी श्री स्वामीजींच्या निर्गुण पादुकांचे मंदिर आहे. १९१४ मध्ये गरूडेश्वर मुक्कामी नर्मदामातेच्या कुशीत समाधी घेतली. स्वामीजी परोक्षपणे आपल्यात आहेत. म्हणूनच प्रत्येक दत्तभक्तांसाठी गरूडेश्वर हे श्रद्धास्थान आहे.























































