निरामय – मन:पूर्वक खा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शमिका कुलकर्णी, (आहारतज्ञ)

सध्या अनेक कारणांमुळे आपण सर्वच मानसिक तणावाखाली जगत आहोत. मग कामाचा ताण असो, तब्येतीची काळजी, घरगुती कारणे किंवा सतत घरी असल्यामुळे असो, पुठे तरी आपल्याला मानसिक तणाव जाणवत राहतो. मग आपण हा तणाव कोणत्या खाद्यपदार्थांनी कमी करू शकतो का? मानसिक आरोग्यासाठी आहारात कोणते पदार्थ घ्यावेत –

दूध – दूध हा हिंदुस्थानी खाद्य संस्कृतीतील महत्त्वाचा पदार्थ आहे. दुधात अनेक उपयुक्त घटक असतात. प्रथिने, कॅल्शिअम आणि त्यासोबत उपयुक्त स्निग्ध पदार्थ. दुधातील कर्बोदके आणि प्रथिने मन शांत करण्यास मदत करतात. रात्री एक कप दूध प्यायल्यास झोप चांगली लागते. मग त्यात हळद, जायफळ घातले तर उत्तम.

दही – दुधासारखेच दहीही अतिशय आरोग्यदायी असल्याने त्याचा फायदा मानसिक तणाव कमी करण्यास होतो. दह्यात प्रथिने आणि कॅल्शिअमसोबत उपयुक्त जिवाणूही असतात. प्रोबायोटिकस् आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात आणि पचनक्रिया व्यवस्थित असेल तर आपले मनही निरोगी राहण्यास मदत होते.

लिंबू किंवा आवळा सरबत – लिंबू किंवा आवळय़ात मुबलक प्रमाणात क जीवनसत्त्व असल्याने हे दोन्ही पदार्थ मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात. लिंबू किंवा आवळय़ाचा रस पाण्यात मिसळून त्याचे सरबत घ्यावे. वाटल्यास थोडा मध घालावा. शरीराचा आणि मनाचा थकवा दूर होतो.

सुका मेवा – सुक्या मेव्यात काजू, बदाम, अक्रोड, अंजीर, बेदाणे पदार्थ असतात. हे सर्वच जिन्नस आरोग्यदायी आहेत. यात जीवनसत्त्व आणि खनिजांचा मुबलक साठा असल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्त्व मिळण्यास मदत होते. नियमित सुक्या मेव्याचा समावेश आहारात केल्याने मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते. फक्त नियमित समावेश असला तरी बेताच्या प्रमाणात खाणे गरजेचे आहे.