
फिल्मीस्टाईल पद्धतीने हवेत गोळीबार करून एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण केल्याची घटना बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देवानगरी येथील पिडब्लूडी कॉलनीत घडली. हवेतील गोळीबारामुळे झालेल्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर गोळीबार आणि अपहरणाचा हा प्रकार उघड झाला.
देवानगरीतील पीडब्ल्यूडी कॉलनीत मदन अवधूत भोसले या बँक अधिकाऱ्याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचा ठेका नजीम पठाण राऊफ पठाण या ठेकेदाराने घेतला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी बांधकामावरील कामकाजाची पाहणी करण्यासाठी ते साईटवर आले होते.
त्याचवेळी एका पांढऱ्या चारचाकी गाडीतून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी पठाण यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर त्यांना धक्का देत जबरदस्तीने गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पठाण यांनी विरोध करताच हवेत गोळीबार केला. पठाण यांना बळजबरीने गाडीत घालून त्यांचे अपहरण केले. हवेतील गोळीबाराने कामगारांनी धाव घेतली असता हल्लेखोर पठाण यांचे अपहरण करून फरार झाले होते.
गोळीबार आणि अपहरणाच्या घटनेची माहिती मिळातच सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे , सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र मळाले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपहरण कोणी आणि का केले याचा शोध पोलीस घेत आहेत.
























































