
>> शमिका कुलकर्णी, (आहारतज्ञ)
तूप पंचामृतातील एक घटक असल्याने हिंदुस्थानी खाद्य संस्पृतीत त्याचे प्रचंड महत्त्व आहे. तुपाला सात्विक अन्न समजले जाते. त्याचे असंख्य गुणधर्म आपल्या शरीराला सशक्त आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
– तुपात असलेले स्निग्ध पदार्थ शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण करतात. म्हणूनच थंडीत आपण अनेक पदार्थांमध्ये तुपाचा समावेश सढळ हाताने करतो.
– तुपात असलेले उपयुक्त स्निग्ध पदार्थ अन्नातील फॅट सोल्युबल जीवनसत्त्वे जसे अ, ड शरीरात शोषून घ्यायला मदत करतात. त्याचबरोबर तुपातसुद्धा ही जीवनसत्त्वे असल्याने ते आरोग्यदायी असते. यामुळे तूप शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते.
– तुपात असलेले ओमेगा 3 फॅटी ऑसिडस् शरीराला अनेक फायदे देतात. अनेक विकारांपासून संरक्षण देतात. तुपाचे नियमित सेवन केल्याने मूळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
– बद्धकोष्टाचा त्रास असल्यास रोज रात्री झोपताना एक चमचा तूप खावे. यामुळे पोट साफ राहण्यास मदत होते.
– तूप हे आपल्या सांध्यांसाठी नैसर्गिक वंगण असल्याचे काम करते. सांधेदुखीचा त्रास असल्यास नियमित थोडय़ा प्रमाणात तुपाचे सेवन करावे. त्रास कमी होतो.
गाईचे तूप जरी आरोग्यदायी असले तरी घरी केलेले म्हशीच्या दुधाचे तूपही तितकेच आरोग्यदायी असल्याने पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी तूप काढावे.
तुपाचा समावेश वरणभातावर, भाकरीवर, खिचडीवर नियमित आवर्जून करावा. त्याच बरोबर मोदक असो पिंवा पुरणपोळी, तुपाचा समावेश आवश्यक असतो. म्हणूनच बेताच्या प्रमाणात तुपाचा समावेश करून त्याचा पुरेपूर आनंद घ्यावा आणि शरीराला निरोगी ठेवावे.





























































