
दिवाळीच्या खरेदीसाठी दुकाने, मॉलमध्ये होणारी गर्दी टाळावी असे आवाहन पालिकेने केले असून नियम पाळले जात आहे की नाही यावर पालिकेची पथके संपूर्ण मुंबईवर नजर ठेवणार आहेत. दुकानदार, मॉल चालकांनी गर्दी टाळण्यासाठी कोविड प्रतिबंधक खबरदारी घ्यावी असे निर्देश देण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन पालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन याआधीच मुंबई महापालिकेने मुंबईकरांना केले आहे. तरीदेखील दिवाळी खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी मॉल, मोठय़ा दुकानात ये – जा करण्याचे दोन मार्ग ठेवा अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. तसेच शारीरिक दुरीकरण पाळणे आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर बंधनकारक केले आहे. दोन दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपल्याने खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. मॉल्स, मोठय़ा दुकानांतही गर्दीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्याच्या सूचना मॉल्स, मोठय़ा दुकानदारांना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. विभागीय अधिकाऱ्यांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.
खबरदारी हाच उपाय
कोरोनावर खबरदारी हाच उपाय असल्याने नागरिकांनी पालिकेने घालून दिलेले नियम पाळावेत असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता बहुतेक व्यवहार सुरू आहेत. यातच दिवाळीनिमित्त शुभेच्छांसाठी नातेवाईक एकमेकांच्या घरी जाणेही शक्य आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. एका व्यक्तीमुळे अनेकांना संसर्गाची बाधा होऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.


























































