दिवाळीत मुंबईतील दोन जैन मंदिरे खुली राहणार! 102 जैन मंदिरे उघडण्याची परवानगी हायकोर्टाने फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिरे खुली करण्याची परवानगी द्यावी यासाठी हायकोर्टात धाव घेतलेल्या जैन बांधवाना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. हायकोर्टाने धनत्रयोदशी ते भाऊबीज या पाच दिवसांसाठी कोरोना सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन करत मुंबईतील केवळ दोनच जैन मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली. ही परवानगी देतानाच 102 जैन मंदिरे खुली करण्याची मागणी फेटाळून लावत याचिकाकर्त्याना त्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

दिवाळीच्या पाच दिवासांसाठी जैन मंदिरे खुली करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करत जैन मंदिरांच्या विश्वस्तांनी अॅड प्रफुल्ल शाह यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्याखंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी अॅड शाह यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की याआधीही जैन समुदायाला कोविड काळात अटी-शर्तीसह तीन मंदिरे खुली करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे 102 जैन मंदिरे खुली करण्याची परवानगी राज्य सरकारने द्यावी, अशी विनंतीही शहा यांनी खंडपीठाकडे केली. मात्र राज्य सरकारने या मागणीला जोरदार विरोध केला.

दिवाळी हा फक्त जैन बांधवांचा सण नसून समस्त हिंदूंसाठी महत्वाचा आणि मोठा सण आहे. त्यामुळे दिवाळीचे पाच दिवस जैन समुदायासाठीच फक्त महत्वाचे आहेत, असा याचिकाकर्त्यांचा दावा निराधार असल्याचा खुलासा राज्याच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला. हायकोर्टाने सरकारची बाजू ग्राह्य धरत 102 पैकी फक्त याचिकाकर्त्या विश्वस्तांना दिलासा देत दोनच जैन मंदिरे 13 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत खुली करून भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी खंडपीठाने दिली.

मंदिर आणि बारची तुलना नको

युक्तिवाद करताना अॅड. शाह यांनी सांगितले की बार, रेस्टॉरंट्स आणि थिएटर सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे मात्र मंदिरे खुली करण्याबाबत परवानगी देण्यास भेदभाव केला जात आहे. त्यावर बारची आणि मंदिराची केलेली तुलना चुकीचे असल्याचे कुंभकोणी यांनी खंडपीठाला सांगितले. आर्थिक अडचणीमुळे बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे कुंभकोणी यांनी सांगितले.