
हेबियस कॉर्पसमध्ये एखाद्या आरोपीने कनिष्ठ न्यायालयात केलेला जामीन अर्ज पेंडिंग असेल तर त्याला आता सर्वोच्च न्यायालयात लगेचच जामीन मिळेल. खरंतर ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामीला दिलेल्या तातडीच्या अंतरिम जामिनामुळे देशात एक नवा पायंडा सर्वोच्च न्यायालयाने पाडला आहे. अटकेत असलेल्या आरोपीची जामिनाची ऑर्डर जरी रात्री कारागृह अधिकाऱ्यांकडे आली तरी त्या आरोपीला सोडावे लागेल, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी दिली.
अर्णबच्या पत्नीने त्याला जामीन मिळावा म्हणून उच्च न्यायालयात केलेला जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अर्णबसह दोन जणांच्या जामीन अर्जावर अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी बाकी असतानाही सर्वोच्च न्यायालयाने त्याला तत्काळ अंतरिम जामीन मंजूर केला. याचा फायदा आता हेबियस कॉर्पस प्रकरणातील आरोपींना मिळेल, असे अॅड. घरत म्हणाले. आजवर जामीन मिळाल्यानंतर सूर्यास्ताच्या आत आरोपीला सोडण्याचे आदेश होते, पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रात्री कधीही ऑर्डर जेल अधिकाऱ्यांना मिळाली तर त्यांना लगेचच आरोपीला तुरुंगाबाहेर काढावे लागणार आहे, याकडेही अॅड. घरत यांनी लक्ष वेधले.


























































