टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांच्या साक्षीने होईल, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूवरील लस बनविण्याच्या प्रक्रियेला आता गती आली आहे. त्यामुळे स्पर्धा आयोजक जपानचाही उत्साह वाढला आहे. कोरोनावर लवकरच लस उपलब्ध झाल्यास टोकियो ऑलिम्पिकचे प्रेक्षकांच्या साक्षीने आयोजन करता येईल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) व्यक्त केला.

कोरोना महामारीच्या संकटामुळे या वर्षी होणारे टोकियो ऑलिम्पिक वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आले. आगामी वर्षी 23 जुलैपासून या क्रीडा महोत्सवास प्रारंभ होणार आहे. फायझर या पंपनीने आपली कोरोनावरील लस 90 टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला आहे. शिवाय जपानमध्ये गेल्या रविवारी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचेही यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ‘आयओसी’ आणि स्पर्धा आयोजकांचाही हुरूप वाढला आहे.

‘आयओसी’चे अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले, कोरोना लसीबाबतची प्रगती आणि जपानमध्ये आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे झालेले यशस्वी आयोजन बघता आमचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकसाठी मोठय़ा संख्येने प्रेक्षक येऊ शकतील असा विश्वास वाटतोय. जागतिक आरोग्य संघटना व अनेक प्रायोजकांच्या आम्ही संपका&त असून कोरोनावर लस उपलब्ध झाल्यास ती घेण्यासाठी नियोजन करू, मात्र कोरोना लस ही सर्वप्रथम डॉक्टर, नर्स, पोलीस, कोविड योद्धे अशा महत्त्वाच्या व्यक्तींना आधी मिळायला हवी, असे मतही बाक यांनी व्यक्त केले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 206 देशांचे 11 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहे. याचबरोबर पॅरालिम्पिक स्पर्धेतही जवळपास 4400 खेळाडू टोकियोमध्ये येणार आहेत, मात्र जपानी व परदेशी प्रेक्षकांना कोणत्या स्टेडियमवर किती प्रमाणात परवानगी दिली जाईल याबाबत अद्यापि काहीच ठरले नाहीये.

n ऑलिम्पिक सराव स्पर्धा आगामी वर्षी सुरुवातीला
जपानमध्ये गेल्या रविवारी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रशिया, चीन व अमेरिकेचे खेळाडू सहभागी झाले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही गर्दी केली होती. त्यामुळे आगामी वर्षी सुरुवातीलाच ऑलिम्पिक सराव स्पर्धा घेण्याचा आम्ही विचार करत असल्याचे टोकियो ऑलिम्पिकचे क्रीडा वितरण अधिकारी हाइडमासा नाकामुरा यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या सराव स्पर्धेसाठी कशी तयारी करायची याबाबत जपान सरकार आणि टोकियो महानगर प्रशासन यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे. मार्चमध्ये या सराव स्पर्धा व्हायला हव्यात, असे आमचे नियोजन आहे. असेही नाकामुरा यांनी सांगितले.