उघडले देवाचे द्वार! उद्यापासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे उघडणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shirdi-trust

सोमवारी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे जाहीर केला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि शिस्तीचे काटेकोर पालन सगळय़ांनाच करावे लागेल, अशी सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केली.

कोरोना आणि त्यापाठोपाठ लॉकडाऊन यामुळे राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद होती. योग्य वेळी प्रार्थनास्थळेही दर्शनासाठी आणि प्रार्थनेसाठी खुली करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला दिली होती. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर प्रार्थनास्थळे खुली करण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, दिवाळीचे मंगलपर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव-देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांबाबत शिस्त पाळलीच.

मास्क घालूनच मंदिरात प्रवेश करा!
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन करताना प्रार्थनास्थळेही बंद करावी लागली हा संदर्भ देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंद असली तरी डॉक्टर्स, परिचारिका आणि वॉर्डबॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱया वस्त्र्ाात भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता सोमवारी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शिस्त आणि नियमांचे पालन करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनास्थळांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं’ची इच्छा समजा! मंदिरातील चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील.

मार्गदर्शक सूचना
– प्रवेशद्वारावर हँडसॅनिट़ायझर व थर्मल स्क्रिनिंग आवश्यक
-मास्कशिवाय प्रवेश नाही
– कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश
– दोनजणांमध्ये सहा फुटांचे अंतर आवश्यक
– कोणत्या वेळेत किती जणांना प्रवेश द्यावा याचे नियोजन गरजेचे
– प्रवेश व बाहेर पडण्यासाठी शक्यतो स्वतंत्र प्रवेशद्वार
– धार्मिक स्थळांमधील मूर्ती- पवित्र ग्रंथांना हात लावण्यास बंदी
– विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भजन-कीर्तन. प्रार्थनास्थळांमध्ये गायन नको
– धार्मिक स्थळांमध्ये हातातून प्रसादाचे वाटप किंवा पवित्र जल अंगावर शिंपडण्यास मज्जाव