दिल्ली डायरी – ‘सुपरओव्हर’मध्ये विरोधक का हरले?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी n [email protected]

ट्वेंटी ट्वेंटी’ सामन्याच्या ‘सुपरओव्हर’प्रमाणे बिहार विधानसभा निवडणूक निकालाचा थरार संपूर्ण देशाने अनुभवला. त्यात अप्रतिम प्रदर्शन करणाऱया तेजस्वी यादव यांना दुर्दैवाने ‘मॅच फिनिशर’ बनता आले नाही आणि जिंकता जिंकता विरोधक पुन्हा एकदा पराभूत झाले. विरोधकांना कोसीचे पाणी पाजले, असा दावा ठोकण्यासारखी कामगिरी सत्तापक्षाची नक्कीच झालेली नाही. संपूर्ण मॅच जबरदस्त परफार्मन्स केल्यानंतर ती सुपरओव्हरच्या अखेरच्या बॉलवर गमावण्याचे दुःख काय असते हे एकेकाळी क्रिकेट खेळलेल्या तेजस्वी यादवांइतके दुसरे कोणाला माहिती असणार!

लालू यादव तुरुंगात असतानाही तेजस्वी यादव यांनी या निवडणुकीत मोठे तुफान आणले आणि राष्ट्रीय जनता दलाला नंबर वन पक्ष बनवला. महागठबंधनच्या रचनेपासूनच झालेल्या काही रणनीतिक चुकांमुळे तेजस्वी यादव यांना जिंकूनही हरावे लागले आहे. दिवसाला विसेक सभा घेऊन तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचा माहोलच बदलून टाकला होता. मात्र नोकरी, शिक्षण आणि स्थानिक प्रश्नांवर सत्ताधाऱयांना जाब विचारणारे तेजस्वी भाजपच्या हिंदु-मुस्लिम ध्रुवीकरणाच्या राजकारणापुढे फिके पडले. पंतप्रधानांसह देशाच्या गृहमंत्र्यांनी जम्मू-कश्मीरमधील 370व्या कलमाचा विषय बिहारात जाऊन उकरून काढल्याने व्हायचा तोच परिणाम झाला. दिमतीला ओवेसींच्या एमआयएमने राष्ट्रीय जनता दलाच्या मायी (मुस्लिम यादव) समीकरणाला जोरदार तडाखा दिला. त्यामुळे तेजस्वी यांच्याकडे नुसती यादव व्होटबँक राहिली. त्याचाही फटका विरोधकांना बसला.

बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदावर सर्वात मोठय़ा पक्षाचा नेता म्हणून ज्यांचा नैसर्गिक दावा असायला हवा, असे तेजस्वी यादव पुन्हा विरोधी पक्षात बसणार आहेत. बिहारची ही निवडणूक तेजस्वी विरुद्ध सर्व अशीच होती. नितीशकुमार यांनी गेल्या काही वर्षांत इतक्या राजकीय कोलांटउडय़ा मारल्या की जनतेतील त्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली. नितीशबाबूंचे संधीसाधू राजकारण बिहारच्या सुजाण नागिरकांनी गुंडाळून ठेवले. त्याचवेळी चिराग पासवान यांच्या ‘बंडखोरीचा चिराग’ नितीशबाबूंविरोधात पेटता ठेवण्याची भाजपची रणनीती यशस्वी ठरली. विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक हल्ले टाळले. मात्र तरीही स्थानिक मुद्दय़ांपेक्षा राष्ट्रीय मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरले. लॉकडाऊनच्या काळात गरीब जनतेला झालेली अन्नधान्याची मदतही भाजपच्या पथ्यावर पडली. त्याचवेळी एमआयएमसह इतर पक्षांनी विरोधकांसह नितीशबाबूंच्या मतपेढीवर डल्ला मारल्याने भाजपचे काम आणखीनच सोपे झाले. निवडणुकीचे मतदान करीपर्यंत बिहारी नागरिक तेजस्वी यांच्यासोबत दिसत होता. मात्र शेवटच्या दोन दिवसांत भाजपने लालूंच्या जंगलराजच्या कहाण्या जनमानसावर बिंबवल्याने त्याचाही मोठा फटका विरोधकांना बसला. जगन्नाथ मिश्रांसारखा कद्दावर नेता गेल्यापासून काँग्रेसला बिहारमध्ये मोठा नेता मिळालेला नाही. संघटनात्मक पातळीवर काँग्रेसमध्ये आनंदीआनंद आहे. संपूर्ण निवडणूक एकहाती लढणे हेही तेजस्वी यांच्यासाठी मोठे आव्हान होते. शेवटी एकटी व्यक्ती म्हणून मर्यादा येतातच. या सगळय़ा गोष्टींचा परिपाक म्हणून जिंकलेली मॅच हरण्याची नामुष्की तेजस्वी यादव यांना पत्कारावी लागली. बिहारच्या अनपेक्षित यशाने भाजपच्या गोटात ‘आत्मनिर्भर’ झाल्याचा ‘फील’ आला असला तरी तो केवळ सुपर ओव्हरचा ‘स्वॅग’ होता हे त्यांनी लक्षात ठेवलेलेच बरे.

धमकीची भाषा

dilip-ghosh
केंद्रात नरेंद्र मोदी व अमित शहा हे बलाढय़ नेते सत्तेवर असल्याने त्यांच्या भरवशावर सध्या भाजपच्या अनेक लहानसहान नेत्यांनी आपल्या जिभा सैल सोडल्या आहेत. पश्चिम बंगालमधले भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे त्यापैकीच एक. यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधाने करण्याचा पराक्रम या महाशयांनी केला आहे. पंतप्रधान कोरोनापासून बचावासाठी ‘दो गज की दूरी’चा संदेश देत असताना घोष महाशयांनी कोरोना संपल्याचे नवे संशोधन जगापुढे आणले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांनी सहा महिन्यांत आपले वर्तन सुधारले नाही तर त्यांचे हात पाय तोडून गळ्यात बांधू, अशी धमकीच घोष यांनी दिली आहे. ममतांची खुर्ची बळकावण्याची भाजपची व्यूहरचना आहे. मात्र या राज्यात खुद्द भाजपमध्येच मोठे ‘गृहयुद्ध’ सुरू आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपात आलेले मुकुल राय आणि दिलीप घोष यांच्यातून आडवा विस्तव जात नाही. घोष यांच्या लहरी वागण्यामुळे राय यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या बंगाल दौऱयातून अंग काढून घेतले होते. शहा यांच्या स्वागतालाही मुकुल राय यांनी दांडी मारली होती. तो भाजपचा अंतर्गत मामला असला तरी बंगालमध्ये भाजपची शिस्त वेशीला टांगल्याचे यानिमित्ताने दिसून आले. ममतादीदींची खुर्ची कधी घालवायची तेव्हा घालवा, मात्र त्याअगोदर पक्षातंर्गत लठ्ठालठ्ठी थांबवा आणि बेताल जिभेला लगाम घाला, हे दिलीप घोष यांना कुणीतरी सांगण्याची गरज आहे.

चिराग यांचे काय होणार?

chirag-paswan
बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा गाजावाजा करूनही केवळ एकच जागा जिंकलेल्या लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांचे पुढे काय होणार, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. रामविलास पासवान यांचे बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीच निधन झाल्याने ही सहानुभूती मिळून लोकजनशक्ती पक्षाला मोठा फायदा होईल असे बोलले जात होते. मात्र चिराग यांनी नितीशकुमार यांचे विसेक उमेदवार पाडण्यापलीकडे फारसे काही केले नाही. रामविलास यांच्या निधनानंतरच्या शोकसमारंभाचा ‘इdव्हेंट’ केल्याची टीकाही त्यांच्यावर झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार दिवाळीनंतर होण्याची चिन्हे आहेत. एक आमदार निवडून आणण्याची कामगिरी करणाऱया चिराग पासवान यांना त्यांच्या वडिलांच्या जागी केंद्रीय मंत्रिमंडळात नरेंद्र मोदी स्थान देणार काय, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. भाजपच्या चिथावणीवरून चिराग यांनी नितीशकुमार यांच्यावर वैयक्तिक आरोप केले. या आरोपांमुळे नितीशबाबू दुखावले गेले आहेत व त्यांनी चिराग यांच्या मंत्रिमंडळ समावेशाला आक्षेप घेतला असल्याचे बोलले जात आहे. भाजपला केवळ कागदावर उरलेल्या ‘एनडीए’साठी का होईना, नितीश व पासवान यांच्यापैकी दोघांना निवडावे लागेल. बिहारमधली सत्तेची गोमटी रसाळ फळे हवी असतील तर भाजपला अनिच्छेने का होईना चिराग यांचा त्याग करावा लागण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळातील संधी हुकली तर चिराग यांचे पुढचे राजकारण खडतर होणार आहे. रामविलास पासवान यांचे नसणे आणि बिहारी जनतेत निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा यामुळे चिराग यांचे काय होणार, असा प्रश्न आहे.